पुण्यात आजपासून या नियमाची अंमलबजावणी होणार .
प्रेस मीडिया :
जीलानी (मुन्ना ) शेख :
पुणे : कोरोना आणि ओमिक्रॉन बाधितांच्या रूग्णांमध्ये देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मुंबईत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासह लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच लोकल प्रवास, मॉलमध्ये प्रवेश अशी नियमावली करण्यात आली असतानाच आता पुण्यातही पीएमपीएलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल पासची सक्ती करण्यात आली आहे.कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात वाढत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पीएमपीएल प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती करण्याचा निर्णय पीएमपीएलने घेतला आहे. पीएमपीएल प्रवास करताना आता दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास बंधनकारक करण्यात आले आहे. पुण्यात आजपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.
बसमधून युनिव्हर्सल पास किंवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसल्यास प्रवाशांना प्रवास करता येणार नसल्याचे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या नियमांचे बसमध्ये कडक पालन करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला असून त्याची अंलजबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात वाहकांना सूचना देण्यात येणार असल्याची माहिती झेंडे यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर बसमध्ये सुध्दा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान काल दिवसभरात राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त बाधितांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांपेक्षा जास्त बाधितांची नोंद होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात रविवारी 41 हजार 327 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल राज्यात 40368 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाची संख्या 68,00,900 एवढी झाल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 94.3% एवढा झाले आहे.