रेल्वेगेट सुरू करण्याच्या मागणी साठी राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वे गेटवर आंदोलन केलं.

रेल्वेगेट वाहतुकीस पूर्णपणे बंद करू नये, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल'..

प्रशांत जगताप (अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)


प्रेस मीडिया ऑनलाइन :

जीलानी (मुन्ना) शेख :

 पुणे : हडपसर , सय्यदनगर - ससाणे नगर रेल्वेगेट क्रमांक ७ हे रेल्वेगेट परिसरातील लोहमार्ग दुरुस्तीच्या नावाखाली ६ जानेवारी पासून रेल्वेगेट वाहतुकीस बंद आहे. हे रेल्वेगेट सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज रेल्वे गेटवर आंदोलन केलं.दरम्यान रेल्वेरुळावर उतरून रेल्वे रोको करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रेल्वेरुळावर येण्यास रोखून धरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

दुरुस्तीचे कारण देत ६ ते २० जानेवारी पर्यंत रेल्वे प्रसासनाने गेट वाहतुकीस बंद केले आहे. मात्र, दहा दिवस उलटले तरी गेटवर प्रत्यक्षात काम सुरू नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज या आंदोलनात सहभागी होऊन रेल्वे प्रशानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार, नगरसेवक योगेश ससाणे, माजी नगरसेवक सुनील बनकर, विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे, सुफीयान इनामदार, विठ्ठल विचारे पाटील, कलेश्वर घुले, बाळासाहेब ससाणे, प्रणयराजे भोसले आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. परिसरातील नागरिक उस्फुर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले होते.

'दुरुस्ती करण्याचे खोटे कारण देत रेल्वे प्रशासनाने सय्यदनगर रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे नोकरदारांना नोकरीधंद्याच्या ठिकाणी पोहोचणं मुश्किल झालं आहे. पर्यायी मार्गानं प्रवास करताना लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. वेळ आणि पैसे खर्च होत आहेत. रिक्षाचालक यांना व्यवसायही ठप्प आहेत. त्यामुळं रेल्वेगेट वाहतुकीस खुले करावे, अशी आमची मागणी आहे.' - फारुकभाई इनामदार (माजी नगरसेवक)

'सय्यदनगर रेल्वेगेटवर रेल्वे उड्डाण पूल व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहेमी प्रयत्न केले. मात्र, त्याला तत्कालीन आमदारांनी विरोध केला. पुढे येथे भुयारी मार्ग व्हावा यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले. फारुकभाई इनामदार नगरसेवक असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भुयारी मार्गाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, त्यालाही विरोध केला गेला. केवळ भाजपच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल होवू शकला नाही आणि आता रेल्वेगेट बंद करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तेव्हा रेल्वे प्रसासनाने येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होत नाही तो पर्यंत हे रेल्वेगेट वाहतुकीस पूर्णपणे बंद करू नये, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल'

 - प्रशांत जगताप (अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आज रेल्वेगेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल्वे रोको आंदोलन नियोजित होते. त्यामुळे येथे सकाळपासून वानवडी व हडपसर पोलिसांचा तसेच रेल्वे पोलीस फोर्सचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूंना तसेच रेल्वे रुळावर अनेक पोलीस तैनात होते. आंदोलनकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही काही काळ रेल्वेगेटवरून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post