सर्व परीक्षांचे अंतर्गत गुण वेब पोर्टलवर निर्धारित वेळेतच भरणे बंधनकारक
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना) शेख :
पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालयांनी सर्व परीक्षांचे अंतर्गत गुण वेब पोर्टलवर निर्धारित वेळेतच भरणे बंधनकारक आहे. अंतर्गत गुण भरण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाचे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021च्या सत्रांच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परीक्षा विभागात विद्यार्थ्यांची विषयनिहाय समरी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. ही समरी महाविद्यालयांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाविद्यालयांकडे परीक्षा विभागाने आवश्यक माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांचे सर्व अंतर्गत गुण, ग्रेड्स भरण्याबाबत संबंधित परीक्षांना प्राचार्य, संचालकांनी आदेशित करावे लागणार आहे.
परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गुण नोंदणी विनाविलंब करण्यात यावी. अंतर्गत गुणांची नोंदणी वेळेवर न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अहितास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहणार आहे. विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठास सहकार्य करणे आवश्यक आहे. त्रुटींची सर्व प्रकरणे कारवाईसाठी परीक्षा प्रमाद समितीसमोर सादर करण्यात येतील, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत पुणे, नाशिक, अहमदनगर मधील महाविद्यालयांच्या प्राचार्य, संचालकांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.