महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी ...
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना ) शेख :
पुणे :शहरातील उद्योग, व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. याकरीता केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून पुरंदर विमानातळाचा प्रस्ताव मार्गी लावावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षात पुणे शहर वेगाने विस्तारते आहे. पुणे आणि परिसरात औद्योगिक क्षेत्रातील मोठे, मध्यम आणि लघु उद्योगांची संख्या 2 लाखांहून अधिक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोनशे कंपन्या असून हा उद्योगही वाढत आहे. या अनुषंगाने व्यापारसुध्दा वाढत चालला आहे. अशा वेळी पुण्याची अन्य शहरे, राज्ये, परदेशातील 25 महत्त्वाची शहरे यांच्याशी कनेक्टीव्हीटी वाढणे जरुरीचे आहे.याकरिता पुण्यालगत आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे.
गेली काही वर्ष खेड, पुरंदर अशा जागांच्या निश्चितीत गेली, आता विमानतळ प्रस्ताव बारगळल्यात जमा होणे पुण्यासाठी परवडणारे नाही. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून लवकरात लवकर सर्वमान्य तोडगा काढावा आणि विमानतळाचे काम सुरू करावे, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे. याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
Tags
पुणे