सर्वच क्षेत्रीय कार्यालयांनी या आदेशाला हरताळ फासला असून सर्व कार्यालयांत गर्दी होत आहे.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे - शहरात करोनाच्या नव्या बाधितांचा आकडा वाढत आहे. तर, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयांत गर्दी टाळण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.अत्यावश्यक वगळता इतर कारणास्तव येणाऱ्या नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या मुख्य इमारतीसह जवळपास सर्वच क्षेत्रीय कार्यालयांनी या आदेशाला हरताळ फासला असून सर्व कार्यालयांत गर्दी होत आहे.
शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा 3 हजारांवर आहे. तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आदेश काढण्यात आले आहेत. महापालिकेतील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठीही अतिरिक्त आयुक्तांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यात, त्यांनी स्पष्टपणे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणीही महापालिकेच्या मुख्य इमारत, परिमंडळ कार्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधी वगळून इतर सर्वांना प्रतिबंध केला आहे. तसेच बैठकांना बोलविण्यात येणारे नागरिक आणि अभ्यंगतांना पास देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देऊन दोन दिवस झाले असले, तरी अद्याप त्याची अंमलबजावणीच मुख्य इमारतीसह कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेली नाही.
ज्या नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांच्या प्रमाणपत्राची खात्री करूनच महापालिकेच्या इमारतींमध्ये प्रवेश द्यावा असेही अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे. मात्र, मुख्य इमारतीसह इतर कोणत्याही कार्यालयांत या प्रमाणपत्राची खातरजमा केली जात नसल्याचे वास्तव आहे. नागरिक कशाला आला, गर्दी का केली याची साधी विचारणाही महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून होत नसल्याचे चित्र आहे.
अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानंतर बुधवारी सकाळी काही वेळ या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे सुरूवातीला गोंधळ उडाला. त्यानंतर अनेकांनी नगरसेवकांची नावे पुढे करत महापालिकेत प्रवेशही मिळवला. मात्र, त्यानंतर काही वेळच या आदेशाची अंमलबजावणी झाली. दुपार नंतर पुन्हा कोणालाही प्रवेशापासून रोखण्यात आले नाही.