पुणेकरांनी चिंता न करता स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी...महापौर मुरलीधर मोहोळ .


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 पुणे : महाराष्ट्रात सोमवारी ६० नवीन ओमायक्रॉन रुग्णांसह १२,१६० नवीन कारोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ११ मृत्यू आणि १,७४८ रुग्ण बरे झाले आहेत.नवीन ओमिक्रॉन प्रकरणांपैकी १७ पुण्यात नोंदवले गेले आहेत. त्यामुळे पुणे प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहर आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली असून अधिकाऱ्यांना विविध सुचना केल्या आहेत.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, १५ ते १८ वयोगटातील बालकांना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी, पुणे विभागातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील तब्बल १९,५८३ किशोरवयीन मुलांना कोविडविरोधी लस देण्यात आली. त्यापैकी ४,१०० किशोरवयीन मुले पुणे महानगरपालिका क्षेत्रातील, १,९४७ पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आणि १३,५३६ पुणे ग्रामीण भागातील होती.

नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असली, तरी त्यात बहुतांश रुग्ण हे लक्षणे विरहित आणि सौम्य लक्षणे असणारे आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आपली आरोग्ययंत्रणा सक्षमपणे सज्ज ठेवली असून पुणेकरांनी चिंता न करता स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी.

महापालिकेकडे सद्यस्थितीत ४ हजार रेमिडिसिव्हीर इंजेक्शन, १ हजार ८०० खाटा, ९ हजार ५०० एलपीएमची ऑक्सिजन निर्मिती क्षमता उपलब्ध आहे. ऑक्सिजन साठवण करण्याची ९ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. शिवाजीनगर जम्बो हॉस्पिटलमध्येही यंत्रणा सज्ज असून कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु करता येऊ शकते.

शिवाय एकूण ऑक्सिजन बेड्सची संख्या आणि कोरोना सेंटरची संख्या आवश्यकरेनुसार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके आणखी सक्रिय केली जाणार आहेत. ही पथके नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई साठी सज्ज असतील. अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post