अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये बालकांचे वाढते प्रमाण चिंता जनक
प्रेस मीडिया वृत्तसेवा
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षभरात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, वाहन चोरी, चोरी, दरोडा व जबरी चोरी अशा गंभीर १२३ गुन्ह्यांमध्ये १४७ विधिसंघर्षित बालकांचा सहभाग आढळून आला आहे.
अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी घटनांमधील सहभाग हा चिंतेचा विषय आहे. या चिंतेत भर घालणारी बाब अशी की, यातील काही बालगुन्हेगार तर आता पोलिसांच्या रेकॉर्डवरील बनले आहेत. मिसरूड फुटण्याआधीच, घरातील जबाबदारी खांद्यावर पडण्याआधीच हातात कोयता, तलवारी, पिस्तूल, काठ्या घेऊन फिरणारी ही चिल्लर गॅंग पुढे जाऊन टोळीचे रूप धारण करते आणि शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकते.कौटुंबिक वातावरण, संगत आणि गुन्हेगारीचे आकर्षण यामुळे मिसरूड न फुटलेली लहान मुलं गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. त्यातच झटपट पैसा मिळवून मौजमजा करण्याची वृत्ती मुलांमध्ये बळावत आहे.
चोरीच्या गुन्ह्यात दोन विधिसंघर्षित मुलींचा देखील सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे केवळ विधिसंघर्षित मुले अशा कुरापती करतात असे नाही, तर विधिसंघर्षित मुली देखील गुन्हेगारी कृत्यात सहभाग होत आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात घडलेल्या ८५ खूनांच्या घटनांमध्ये ८ खुनाच्या गुन्ह्यांमध्ये ११ विधिसंघर्षित मुलांचा सहभाग आढळला आहे. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये विधिसंघर्षित मुलांचे प्रमाण अधिक आहे.
अनेक गुन्हेगारी टोळ्या, सराईत गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये वापर करून घेतात. १८ वर्षांखालील मुलांना कठोर शिक्षा होत नाही, हे आता सर्वश्रुत झाल्याने त्याचाच फायदा सज्ञान आरोपी घेताना दिसतात. सुरुवातीला पाकिटमारी, चोरी करणारी ही मुले पुढे घरफोडी, दरोडे तसेच हाणामारीच्याही सुपा-या घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. शिक्षण, सामाजिक वातावरण, व्यसनाधीनता, सोशल मीडिया, मोबाईलचा अतिवापर, चित्रपट आणि मालिकांमधून होणारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण अशी अनेक कारणे बालगुन्हेगारीसाठी पोषक आहेत, ज्यामुळे विधिसंघर्षित मुलांचे गुन्ह्यातील प्रमाण वाढत आहे.
‘मी या भागातला भाई आहे. मला घाबरायचं. मला हप्ता द्यायचा. मी अमक्याचा उजवा हात आहे. मी तमक्याचा शागीर्द आहे’. अशी बिरुदावली मिरवत ही पोरं दहशत निर्माण करतात. कमावण्याची शून्य अक्कल असताना गळ्यात सोन्याचे गोफ, फिरायला आलिशान दुचाकी, चारचाकी गाड्या हे त्यांच्याकडे येतं कुठून, हा संशोधनाचा विषय आहे. बहुतांश जणांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. पण मुलगा मात्र रुबाबात गाडीवर फिरताना दिसतो, हे चित्र भविष्याच्या दृष्टीने काही बरे नाही.
*जाहिरात व बातम्यांसाठी प्रेस मीडिया लाईव्ह*