हडपसर येथे बिर्याणीच्या पैशांवरून तुफान हाणामारी

टोळक्याने टिक्का भाजण्याच्या सळईने बिर्याणी विक्रेत्यावर  हल्ला चढवल्याचे समोर आले 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

अनवरअली शेख :

 पुणे :  हडपसर येथे बिर्याणीच्या पैशांवरून तुफान हाणामारी झाली आहे. बिर्याणी शॉपच्या सीसीटीव्हीमध्ये  ही घटना कैद झाली आहे. बिर्याणीच्या पैशांवरून झालेल्या वादानंतर टोळक्याने टिक्का भाजण्याच्या सळईने बिर्याणी विक्रेत्यावर  हल्ला चढवल्याचे समोर आले आहे.काळेबोराटेनगर येथे 12 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १२ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी मुईनुद्दीन खान यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

काळेबोराटेनगरमधील यशराज ग्रीन कास्टल येथे हॉटेलचे वेटर हे केटरिंगचे काम करत होते. त्यावेळी आरोपींनी साथीदाराच्या मदतीने बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून धमकी देत शिवीगाळ करीत, टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी दुकानातील टाईल्स फोडून नुकसान केले आहे. तसेच सळई हवेत फिरवून आजूबाजूच्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडून परिसरात दहशत निर्माण केली. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आर गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post