विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गोव्या पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठे भगदाड

राजीनामा सत्रामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

  विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गोव्या पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठे भगदाड पडले आहे. मंगळवारी योगी सरकारमधील एका मंत्र्यासह चार आमदारांनी तडकाफडकी राजीनामा देऊन भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या स्वप्नांना जबर हादरा दिला.राज्याचे कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देऊन लगेच समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. या राजीनामा सत्रामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. 2024 मधील लोकसभा निवडणुकीची 'सेमी फायनल' म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे भाजप पाचही राज्यांत पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपच्या या तयारीला सुरुंग लावण्याचा धडाका पक्षातीलच आमदार-मंत्र्यांनी लावल्याचे चित्र गोवा आणि त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात दिसून आले आहे. सोमवारी गोव्यात घडलेल्या राजीनामासत्रानंतर मंगळवारी उत्तर प्रदेशात भाजपला मोठा झटका बसला. सकाळी कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना पाठिंबा देत बृजेश प्रजापती, भगवती प्रसाद सागर, विनय शाक्य आणि रोशनलाल वर्मा या चार आमदारांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली. स्वामी प्रसाद यांची मुलगी संघमित्रा मौर्य हीदेखील भाजपची खासदार आहे. मंत्री-आमदारांच्या राजीनाम्याच्या धडाक्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची चिंता वाढली आहे.

दलित शेतकऱ्यांची भाजपकडून घोर उपेक्षा

स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्यपालांना ई-मेलवरून आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पाठवला. विपरीत परिस्थिती व विचारधारा असूनही मंत्री म्हणून मी मनापासून जबाबदारी पार पाडली. मात्र भाजपच्या योगी सरकारने दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱ्यांची घोर उपेक्षा केली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. योगी सरकारच्या याच अनास्थेमुळे मी राजीनामा देत आहे, असे मौर्य यांनी म्हटले आहे.

भाजपचा ऐतिहासिक पराभव होणार - अखिलेश

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचे पक्षात स्वागत करीत त्यांच्या भेटीचा पह्टो सोशल मीडियात शेअर केला. याचवेळी त्यांनी भाजपला लागलेल्या आमदार-मंत्र्यांच्या गळतीवर प्रतिक्रिया दिली. सामाजिक न्यायाची क्रांती होईल आणि भाजपचा ऐतिहासिक पराभव होईल, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.


आणखी आमदार मंत्री भाजपची साथ सोडणार

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यापाठोपाठ योगी सरकारमधील राज्यमंत्री धर्म सिंह सैनी यांच्यासह आणखी तीन आमदार भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. ममितेश शाक्य, धमेंद्र शाक्य, नीरज मौर्य हे आमदार समाजवादी पार्टीत जाण्याच्या वाटेवर असल्याने योगी सरकारची सत्तेत येण्याची वाट खडतर मानली जात आहे.

मायावती निवडणूक लढणार नाहीत

उत्तर प्रदेशात जोरदार राजकीय उलथापालथ सुरू असतानाच बहुजन समाज पार्टीने (बसपा) मंगळवारी मोठी घोषणा केली. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा, त्यांची पत्नी कल्पना मिश्रा, मुलगा कपिल मिश्रा आणि मायावती यांचा भाचा आकाश आनंद हेदेखील निवडणूक लढवणार नाहीत.

कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर बृजेश प्रजापती भगवती प्रसाद सागर विनय शाक्य आणि रोशनलाल वर्मा या चार आमदारांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली .

Post a Comment

Previous Post Next Post