आरक्षण सोडत नंतर काढली जाणार , आता सर्वांचे लक्ष प्रभाग रचनेकडे..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकी साठी अगोदर प्रभाग रचना जाहीर होणार असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून येत्या दोन दिवसात प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता मिळेल.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकाचदिवशी जाहीर केली जाते. परंतु, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थंडावली होती. ओबीसींच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयुक्त यु.पी.एस मदान यांनी घेतला.
दोन दिवसात प्रभाग रचना जाहीर होणार?
राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर, आरक्षित प्रभागांची सोडत काढण्यापूर्वी, प्रथम निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारे प्रारूप शासन राजपत्रात प्रसिद्ध करून त्यास योग्य ती प्रसिद्धी द्यावी. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणाऱ्या प्रारूप अधिसुचनेवर विहीत कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात याव्यात. हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात यावी.
प्राप्त हरकती व सूचनांवर आयोगाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी देण्यात यावी. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिका-यांनी केलेल्या शिफारशी विहीत नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात यावे. प्राप्त हरकती व सूचनांवर योग्य तो निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त करून घेण्यात यावा. राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयानुसार योग्य त्या दुरुस्त्या करुन निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी अंतिम अधिसूचना राज्य निवडणूक आयोगास स्वाक्षरीकरिता सादर करावी.
स्वाक्षरीनंतर अतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून त्यास योग्य ती प्रसिद्धी देण्यात यावी. याप्रमाणे निवडणूक प्रभागाच्या सीमा अतिमतः अधिसूचित केल्यानंतर त्या प्रभागात आरक्षण निश्चित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्ररीत्या देण्यात येतील. सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या दिनांकास प्रभागनिहाय आरक्षण दर्शविणारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात यावी, असा आदेश निवडणूक आयुक्त मदान यांनी महापालिकेला दिला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात प्रारुप प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.