महानगरपालिका भवनासह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात आज लावण्यात येणार
प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे स्वतंत्र नकाशे, एकत्रित नकाशा आणि त्यात समाविष्ट भागांची माहिती देणारे फलक महानगरपालिका भवनासह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात आज मंगळवारी सकाळी लावण्यात येणार आहेत.महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नकाशे व माहिती पाहता येणार आहे. प्रभागरचनेवर सूचना व हरकती लेखी स्वरूपात समक्ष द्यावे लागणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने त्रिसदस्यीय प्रभागरचना प्रसिद्धी करून त्यावर हरकती व सूचना मागविणे, त्यावर सुनावणी घेण्याचा कार्यक्रम मागील आठवड्यात जाहीर केला. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभाग प्रत्यक्ष कार्यवाही करीत आहेत. तो विभाग मंगळवारी सकाळी दहाला प्रभागरचना जाहीर करणार आहे. महापालिका भवनातील पार्किगमध्ये सर्व ४६ प्रभागांचा एकत्रित नकाशा, सर्व प्रभागांचे स्वतंत्र नकाशे व त्यात समाविष्ट असलेल्या भाग व त्याच्या चतु:सीमेची माहिती असलेले फलक लावले जाणार आहेत.
येथील असतील नकाशे : त्या सोबत सर्व क्षेत्रीय कार्यालयात नकाशे लावले जाणार आहेत. भेळ चौक निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेले ब क्षेत्रीय कार्यालय, नेहरूनगरच्या हॉकी स्टेडिमयशेजारी असलेले क क्षेत्रीय कार्यालय, रहाटणीतील ड क्षेत्रीय, भोसरीतील पांजरपोळ येथील ई क्षेत्रीय कार्यालय, निगडीतील टिळक चौकातील फ क्षेत्रीय कार्यालय, थेरगावातील यशवंतराव चव्हाण शाळा संकुलातील ग क्षेत्रीय कार्यालय आणि कासारवाडीतील आयटीआय इमारतीतील ह क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात नकाशे व माहिती पाहायला मिळणार आहे.
सूचना आणि हरकतींसाठी : प्रभागरचनेबाबत हरकती व सूचना या लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. त्या समक्ष क्षेत्रीय अधिकारी किंवा महापालिका भवनातील निवडणूक विभागात द्याव्या लागणार आहेत. हरकती व सूचना १४ फेबु्रवारीपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सूचना व हरकती १६ फेब्रुवारीस राज्य निवडणूक आयोगास सादर केल्या जातील. त्यावर २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
हरकती व सूचना ऑनलाइन स्वीकारणार नाही
''महापालिका भवन व सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात प्रभागरचनेचे नकाशे व त्यात समाविष्ट भागांची माहितीचे फलक मंगळवारी लावण्यात येणार आहेत. त्याबाबत जाहीर प्रकटन मंगळवारीच वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. प्रभागरचनेबाबत हरकती व सूचना लेखी स्वरूपात समक्ष स्वीकारल्या जाणार आहेत. त्या ऑनलाइनग्राह्य धरल्या जाणार नाहीत असे बाळासाहेब खांडेकर (निवडणूक विभाग, सहायक आयुक्त) यांनी सांगितले.''