राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी तोफ डागली.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु झाला आहे.तो पूर्ववत करण्यासाठी शहरात अतिरिक्त पाणी आणण्याचे त्यांनी केलेले वायदे फेल गेले आहेत. पाणी पुरवठा करणारे मावळातील पवना धरण भरूनही शहराला दररोज पाणी मिळत नाही. त्यावरून विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने शनिवारी (ता.२२ जानेवारी) भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला. पाणी प्रश्नावर सत्ताधारी फक्त चमकोगिरी करीत असल्याची तोफ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डागली. तर, दररोज पाणी कधी मिळणार, अशी विचारणा आता त्रस्त रहिवाशीही करू लागले आहेत.
वाघेरे म्हणाले, शहरासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून देण्याबाबत भाजपने सातत्याने चमकोगिरी केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी केलेला डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत अतिरिक्त पाणीसाठा आणण्याचा दावा फोल ठरला आहे. सत्ताधा-यांच्या नाकर्तेपणामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे आता सोसायट्यांना विहीरीतून पाणी पुरविण्याची वेळ त्यांच्यावर आली, या शब्दात वाघेरेंनी जोरदार टीका केली आहे.
वाढते नागरिकरण आणि लोकसंख्या विचारात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरासाठी आंद्रा, भामा आसखेड धरणात पाणी कोटा आरक्षित केला. ते पाणी आणण्याचे नियोजनही सुरू केले होते. मात्र, २०१७ मध्ये भाजपने फसव्या घोषणा करून पालिकेची सत्ता मिळवली आणि हे पाणी शहरात आले नाही. तरीही राष्ट्रवादीच्या काळात शहरात दिवसातून किमान दररोज पाणीपुरवठा केला जात होता. २४ तास पाणी देण्याचे नियोजनही सुरू केले गेले. परंतु भाजपच्या हाती सत्ता गेल्यापासून शहरातील पाणीप्रश्न बिकट बनलेला आहे. नागरिकांना दररोज एकवेळही पाणीपुरवठा न होत नाही. भाजपला सत्ता मिळाल्यानंतर दिवसाआड शहराला पाणी पुरविले जात आहे. कोट्यवधींचा नुसता खर्च करून भाजपने शहराची फसवणूक आणि नागरिकांचा विश्वासघात केलेला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चिखली भागात सोसाय़टीतील रहिवाश्यांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी चक्क भाजप नगरसेवकाने विहिर बांधली. त्या विहीरचे उद्घाटन सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी केले. ज्या शहराला पालिका यंत्रणेच्या माध्यमातून सुरळित पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सत्ताधा-यांची आहेत. ते विहीरीचे पाणी वापरण्यास भाग पाडत आहेत. या पेक्षा दुर्दैवी बाब कोणती ? हे भाजपचे पाच वर्षातील सर्वात मोठे अपयश म्हणावे लागेल. याचे उत्तर शहरातील सुज्ञ नागरिक आगामी निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाहीत, असेही वाघेरे म्हणाले.