नवीन आदेश राज्य निवडणूक आयोगाचे प्रभारी सचिव अविनाश सणस यांनी दिला
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अन्वरअली शेख :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण निश्चितीकरिता प्रगणक गट (ब्लॉक)ची लोकसंख्या, भौगोलिक सीमा याची कागदोपत्री सविस्तर माहिती समाविष्ट करुन प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करुन सादर करण्यास ९ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे नवीन आदेश पिंपरी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच यासोबत महापालिका हद्दीतील लोकसंख्या, सदस्यसंख्या, आरक्षण, प्रभागांची संख्या याचा तपशील दिला आहे. यासंदर्भात कोणतीही शंका असल्यास ७ जानेवारीपर्यंत आयोगाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीकरिता सुधारित आदेश काढले. त्यानुसार महापालिका प्रशासनाला प्रारुप प्रभाग रचनेचा संपूर्ण प्रस्ताव तयार करुन १५ जानेवारी २०२२ रोजी पर्यंत आयोगाला सादर करायचा आहे. सदस्यसंख्या व आरक्षणाची परिगणना, हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत, निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या, प्रगणक गटनिहाय माहिती, अनुसूचित जातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, अनुसूचित जमातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, सदस्य संख्या व आरक्षणाचे एकत्रित विवरणपत्र, प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र, समितीने प्रारुप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र अशी सविस्तर माहिती सादर करावी लागणार आहे.