अश्लील भाषेत शिव्यांचे व्हीडिओ करुन सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या 'थेरगाव क्विन'ला पोलिसांकडून अटक

तरुणीला समज देऊन तिची जामीनावर सुटका ..

प्रेस मीडिया ऑनलाइन :

पठाण एम एस :

 पिंपरी चिंचवड : अश्लील भाषेत शिव्यांचे व्हीडिओ करुन सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तथा कथित पिंपरी चिंचवड मधील 'थेरगाव क्विन'ला पोलिसांनी अटक केली आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ संबंधित तरुणी पोस्ट करत असल्याने आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तरुणीला अटक केली आहे.त्या तरुणीला समज देऊन तिची जामीनावर सुटका झाली आहे.

'थेरगाव क्विन' या नावाने साक्षी हेमंत श्रीमल (वय 18 ) ही तरुणी इन्स्टाग्राम अकाऊंट चालवत होती. तिच्या साथीदारांसोबत मिळून इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत आणि धमकीचे अनेक व्हीड्ओ तिने तयार केले आहेत.

या मुलीला हजारो तरुण फॉलो करत होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणीला रविवारी (30 जानेवारी) अटक केली. अटक केल्यानंतर तरुणीने गुन्हा कबूल करुन माफी देखील मागितली.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं, "घटनेचे गांभीर्य पाहून त्या तरुणीला पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे अशा गोष्टींना नक्कीच आळा बसेल. असे व्हीडिओ बनविणारे तरुण पुढे गुन्हेगारीकडे वळतात. ते गुन्हेगारीकडे जाऊ नयेत म्हणून अशा तरुणांना वेळेत आळा घालणे गरजेचे आहे. जे काही बेकायदेशीर असेल त्यावर पोलीस पुढे ही कारवाई करणारच."

पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षी ही मध्यमवर्गीय घरातील मुलगी आहे. तिला आई वडील नाही त्यामुळे तिचा सांभाळा तिची आजी करते. साक्षी सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे.

तिने शिवीगाळ करणारे, अश्लील भाषा असलेले अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले आहेत. इन्स्टाग्रामवर मिळाणाऱ्या लाईक्सच्या हव्यासापोटी तिने असे व्हीडिओ तयार केले, अशी माहिती वाकड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली.

प्रसिद्धी साठी काही पण

लाईक्स आणि प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे अनेक व्हीडिओ तरुण तयार करत असल्याचं पुणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post