सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या या कामाची निविदा संशयास्पद असून सत्ताधाऱ्यांचा स्मार्ट भ्रष्टाचाराचा हा प्रयत्न
प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी : महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता जवळ आल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समिती आता शेकडो कोटी रुपयांची उड्डाणे भरु लागली आहे.गेल्या बैठकीत तिने २०७ कोटींचे प्रस्ताव मंजूर केले. त्यात एकच विषय हा शहरात नव्याने सीसीटीव्ही बसविण्याचा पावणेदोनशे कोटी रुपयांचा आता वादाच्या भवऱ्यात सापडला आहे.
सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या या कामाची निविदा संशयास्पद असून सत्ताधाऱ्यांचा स्मार्ट भ्रष्टाचाराचा हा प्रयत्न असल्याने या कामासाठी कार्यादेश देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
सदर निविदेतील पाच निविदाधारकांपैकी तिघांना विविध कारणांसाठी अपात्र ठरविण्यात आले व नंतर मे. मेट्रिक्सला हे काम देण्यात आले. तीन निविदाधारक अपात्र होणे आणि पात्र दोन निविदाधारक कंपन्यांच्या दरामधील मोठी तफावत यामुळे ही निविदा पूर्णतः संशयास्पद असल्याचे वाघेरे यांचे म्हणणे आहे.