प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार...
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका प्रशासनाने बप्रारुप प्रभाग रचनेचा कागदोपत्री प्रस्ताव 13 जानेवारी 2022 रोजी आयोगाला सादर केला होता. सदस्यसंख्या व आरक्षणाची परिगणना, हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत, निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या, प्रगणक गटनिहाय माहिती, अनुसूचित जातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, अनुसूचित जमातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, सदस्य संख्या व आरक्षणाचे एकत्रित विवरणपत्र, प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र, समितीने प्रारुप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र अशी सविस्तर कागदोपत्री माहितीचा प्रस्ताव पाठविला होता.
3 सदस्यांचे 45 तर 4 सदस्यांचा 1 प्रभाग असणार!
शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यात अनुसूचित जाती (एससी)ची 2 लाख 73 हजार 810 आणि अनुसूचित जमाती (एसटी)ची 36 हजार 535 लोकसंख्या आहे. नगरसेवकांची संख्या 139 आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असणार आहे. 114 जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील. त्यातील 57 जागा महिलांसाठी असतील.
अनुसूचित जाती (एससी)साठी 22 जागा राखीव असतील. त्यात 11 महिला आणि 11 पुरुषांसाठी जागा असणार आहेत. 2 महिला आणि 1 पुरुषाकरिता अशा 3 जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत एकूण 46 प्रभाग असणार आहेत. त्यात 3 सदस्यांचे 45 आणि 4 सदस्यांचा 1 प्रभाग असणार आहे.