प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड : पठाण एम एस :
पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडाभरासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी शनिवारी दिली.राज्यभरात सोमवारपासून (दि. 24) पहिली ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिथे रुग्णसंख्या जास्त आहे तिथे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या दररोज 4 ते 5 हजार रुग्ण आढळत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरात तूर्तास शाळा सुरू करू नका, अशी भूमिका महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी पुण्यात आयोजित बैठकीत मांडली. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडाभरासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे.
महापौर ढोरे म्हणाल्या, शहरामध्ये सध्या करोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे लगेचच शाळा सुरू करू नका, अशी भूमिका आम्ही मांडली. पर्यायाने, शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडाभरासाठी थांबविला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.