दामदुप्पट करून देतो असे सांगून तरुणाची तब्बल ५३ लाख रुपयांची फसवणूक .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी चिंचवड मध्ये शेअर घोटाळा समोर आला आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवलेल्या पैशांवर १५ दिवस ते एका महिन्यात गुंतवणूक केलेल्या रकमेच्या १० ते २० टक्के परतावा अथवा दामदुप्पट करून देतो असे आमिष दाखवून तरुणाची तब्बल ५३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना १ एप्रिल २०१९ ते ५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडली आहे.
मेघनसिंह अमरसिंह पाटील वय २७ रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमेघ जोशी रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर, जि. सांगली, त्याची पत्नी रा चापेकर चौकाजवळ, चिंचवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास त्या पैशांवर मुदतीत १० ते २० टक्के परतावा देतो अथवा गुंतवणूक केलेले पैसे दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवले. त्याआधारे फिर्यादीचा आरोपींनी विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून ५३ लाख नऊ हजार रुपये घेऊन त्या पैशांचा मोबदला ठराविक दिवसात दिला नाही. तसेच दामदुप्पट रक्कमही दिली नाही. फिर्यादी यांच्या नावावर एकही शेअर खरेदी केला नाही. आरोपी पैसे देतील असा विश्वास असल्याने फिर्यादी यांनी दोन वर्षे वाट पाहिली. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत