याचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच आहे ... राज ठाकरे..
प्रेस मीडिया ऑनलाइन :
महाराष्ट्र सरकारने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक केलं आहे. सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत याचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच आहे असं म्हंटल आहे.
या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलनं केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. सरकारने आता हा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन, बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असं राज ठाकरे म्हणाले
तसेच महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन, सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.