भाजपच्या 12 निलंबित आमदार प्रकरणी आज विधानभवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या पुढे सुनावणी होणार



प्रेस मीडिया ऑनलाइन :

 मुंबई : भाजपच्या 12 निलंबित आमदार प्रकरणी आज विधानभवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे.यामध्ये भाजपच्या निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतले जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज दुपारी होणाऱ्या या सुनावणीला भाजपचे नेते अतुल भातखळकर उपस्थित राहणार नाहीत. कारण कोरोनामुळे उपस्थित राहू शकत नाही असं त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे. याशिवाय आमदार गिरीश महाजन, आमदार राम सातपुते हे देखील उपस्थित राहू शकणार नाहीत.

आज दुपारी भाजपच्या 12 निलंबित आमदारांची सुनावणी विधानसभा उपाध्यक्ष यांच्या दालनात होणार आहे. उद्या याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी देखील होणार आहे. त्याआधी निलंबन मागे घेतलं जातं का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वोच्य न्यायालयाने 14 डिसेंबर 2021 ला विधीमंडळास नोटीस जारी केली होती. निलंबित आमदारांबाबत अर्ज करूनही अधिवेशन (22 ते 28 डिसेंबर) कालावधीत काहीच निर्णय घेतला गेला नाही. आता उपाध्यक्षांना अध्यक्षपदाचा प्रभारी चार्ज आहे. त्यामुळे त्यांना थेट निर्णय घेण्याचा अधिकार नाही, यामुळे आता लेखी उत्तर तुर्तास विधीमंडळ सचिव यांना कळवत असल्याचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, आज होणाऱ्या या सुनावणीला भाजप आमदार आशिष शेलार, अभिमन्यू पवार, जयकुमार रावल हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिवेशनादरम्यान भाजपच्या काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला होता. तालिका अध्यक्षासमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला होता. सभागृह तहकूब झाल्यानंतरही सदस्य शांत झाले नव्हते. त्यांनी अध्यक्षांच्या दालनातही गोंधळ घातला होता. त्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले होते. भाजप सदस्यांच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षानं निलंबनाचा ठराव आणला होता. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. त्यानुसार, भाजपच्या 12 सदस्यांना एक वर्षासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं. निलंबीत केलेल्या आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया यांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post