टिपू सुलतान प्रकरण : वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवर गंभीर आरोप


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 मुंबई : मालाड मधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून सुरु आलेला वाद काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन मालाडमध्ये भाजपा तर्फे आंदोलन करण्यात आले या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. या सगळ्या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.


हा हिंदू मुस्लीम वाद पेटवण्यासाठीचा मुद्दा असल्याचं सांगत डॉ. आंबेडकर म्हणाले, 'टिपू सुलतान हा फार महत्वाचा मुद्दा आहे अस मी मानत नाही. आर.एस.एस आणि भाजपाला अँटी मुस्लीम लाट निर्माण करणं हे जिंकण्याचं साधन आहे असं ते मानतात. हळू हळू आपला जनाधार कमी होतोय का या भीतीपोटी त्यांनी आता अँटी मुस्लीम भूमिका घ्यायची सुरूवात केली आहे. मुंबईतही त्यांनी टीपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद उपस्थित केला आहे. दंगल होईल अशी परिस्थिती आहे. जोवर हिंदू मुस्लीम वाद पेटत नाही, तोवर शासन आपल्या हातात येईल असे त्यांना वाटत नाही. म्हणून उद्याच्या कालावधीत ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं', असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे. बुधवारी क्रीडा संकुलाच्या उद्धाटनाआधी भाजपा, बजरंग दलाने नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर आंदोलनासाठी उपस्थित होते. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन केले आहे. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात आंदोलनचे लोण पसरण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post