प्रेस मीडिया :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर (शिंदे) :
मिरज शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे.
मिरज शहर परिसरातील नागरिकांमधून वारंवार प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व्हावे ही मागणी होत आहे. परंतु आजदेखील शहरांमधील प्रमुख रस्ते हे अरुंद आहेत त्यातच वाढत असलेली लोकसंख्या व वाढत्या वाहनांचे प्रमाण यामुळे तसेच शहरात होत असलेल्या अतिक्रमणे यामुळे रस्ते अधिकच अरुंद होत चालले आहेत. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थादेखील शहराच्या रस्त्यांवर दिसून येत नसल्याने मिरजेमध्ये वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याकरिता मिरज शहर परिवर्तन समिती सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेऊन रुंदीकरणाची मागणी केली.
मिरज शहर परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजरुक, संतोष माने, बाळासाहेब पाटील, शाहीद सतारमेकर, अमजद जमादार, गीतांजली पाटील, सचिन गाडवे, इमरान मर्चंट,नय्युम नदाफ, मनोहर कुरणे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांची भेट घेऊन शहरातील व परिसरातील महात्मा गांधी चौक ते बॉम्बे बेकरी मार्गे महाराणा प्रताप चौक, राजर्षी शाहू महाराज चौक ते किसान चौक( मौलाना अबुल कलाम आझाद मार्ग),अब्दुल करीम खाँ चौक ते दर्गा मार्गे अश्फाक उल्ला खान चौक (शहर पोलीस ठाणे),श्रीराम हॉल ते बालगंधर्व नाट्य गृह,श्री खंडोबा देवालय ते गुरुवार पेठ मार्गे शास्त्री चौक, बाँम्बे बेकरी ते कमानवेस मार्गे दिंडीवेस,किसान चौक ते शास्त्री चौक (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग) ह्या रस्त्यांचे रुंदीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तरी शहराच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून रुंदीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली.