कोरोना मुळे गरीबांना घास मिळणे कठीण

       तर श्रीमंतांची संपत्ती अनेक पटीने वाढली


प्रेस मीडिया ऑनलाइन : 

अनवरअली शेख :

कोरोनाने कोटय़वधींना आपल्या विळख्यात घेतले. लाखो आबालवृद्धांचे बळी घेतले. जे वाचले त्यांनाही औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्यावरच नव्हे, तर लोकांच्या  उत्पन्नावरही  कोरोनाने  परिणाम केला.कोरोनाच्या पहिल्या दोन वर्षांच्या काळात 99 टक्के नागरिकांचे उत्पन्न कमी झाले आणि सुमारे 16 कोटी लोकांना गरीबीच्या खाईत लोटले. दुसरीकडे श्रीमंतांची संपत्ती अनेक पटीने वाढली, असे एका अहवालात म्हटले आहे.

'ऑक्सफाम इंडिया'ने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी यासंदर्भातील 'इनइक्वॅलिटी कील्स' हा अहवाल प्रकाशित केला. कोरोना लॉकडाऊनमुळे कोटय़वधी लोकांना आपल्या नोकऱया गमवाव्या लागल्या. व्यापार-उद्योग बंद पडले. त्याचा परिणाम लोकांच्या उत्पन्नावर झाला आणि नशिबी गरिबी आली. जगात असमानता निर्माण झाली. गरीब आणखीनच गरीब झाला आणि दुसरीकडे श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत राहिली असे हा अहवाल सांगतो. कोरोनामुळे नोकऱ्या गमावणाऱयांमध्ये 28 टक्के महिलांचा समावेश आहे. त्यांचे उत्पन्न दोनतृतीयांश इतके कमी झाले. 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने महिला आणि बालविकासावर जितका खर्च केला तो देशातील श्रीमंतांच्या यादीतील शेवटच्या दहा जणांच्या एकूण संपत्ती इतकाही नव्हता.

गरीबाला घास मिळणे कठीण, श्रीमंतांची रोज 9 हजार कोटींची कमाई

कोरोनामुळे गरीब-श्रीमंतां मध्ये दरी वाढली. ही दरी इतकी वाढली की, गरीबांना दोन वेळचे अन्नही मिळणे कठीण झाले आणि श्रीमंतांच्या घरी पैशांचे ढीग वाढतच गेले. जगातील 'टॉप 10' श्रीमंतांची संपत्ती कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात 111 लाख कोटी रुपयांनी वाढली. म्हणजेच दर दिवशी त्यांच्या संपत्तीमध्ये 9 हजार कोटी रुपयांची भर पडली, असे 'ऑक्सफाम इंडिया'च्या कार्यकारी संचालिका गॅब्रिएला बचर यांनी सांगितले.

रोज 7 कोटी उडवले तरी पैसा संपायला 84 वर्षे लागतील

समुद्रातून कितीही पाणी उपसले तरी तो आटणार नाही. देशातील श्रीमंतांची संपत्तीही तशीच आहे. 'टॉप 10' श्रीमंतांनी रोज 7.4 कोटी रुपये खर्च केले तरी त्यांच्याजवळील पैसा संपायला 84 वर्षे लागतील. देशातील श्रीमंतांवर संपत्ती कर लावला गेला तर 5.8 लाख कोटी रुपये जमा होतील. त्या पैशांतून देशाचे हेल्थ बजेट 271 टक्क्यांनी वाढवता येऊ शकते.

अब्जाधीशांच्या संपत्तीत दुपटीपेक्षा जास्त वाढ

भारतातील अब्जाधीशांची संपत्ती कोरोना काळात दुपटीपेक्षा जास्त वाढली असे या अहवालात नमूद आहे. हिंदुस्थानात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या दहा व्यक्तींकडे इतकी संपत्ती आहे की, ते पुढील 35 वर्षे देशातील सर्व शाळा-महाविद्यालये चालवू शकतील. या श्रीमंतांनी उद्या त्यांची 99 टक्के मालमत्ता गमावली तरीही ते पृथ्वीवरील 99 टक्के लोकांपेक्षा श्रीमंत असतील असे 'ऑक्सफाम इंडिया'च्या कार्यकारी संचालक गॅब्रिएला बचर यांनी सांगितले.

  • कोरोनामुळे संपत्तीच्या बाबतीत इतकी असमानता वाढली की, देशातील 10 टक्के श्रीमंतांकडे देशाची 45 टक्के संपत्ती आहे. दुसरीकडे 50 टक्के गरीबांकडे फक्त 6 टक्के संपत्ती आहे.
  • देशातील 'टॉप 10' श्रीमंतांवर 1 टक्का जास्त कर लावला गेला तर देशाला इतका पैसा मिळेल की, त्यातून 17.7 लाख ऑक्सिजन सिलिंडर्स विकत घेता येतील, ज्याची देशाला आता गरज आहे.
  • देशातील 98 श्रीमंत कुटुंबीयांवर 1 टक्का जास्त कर लावला गेला तर 'आयुष्मान भारत' योजना पुढील सात वर्षे चालवता येऊ शकेल. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे.
  • देशातील 55.5 कोटी नागरिकांच्या एकूण संपत्तीइतकी संपत्ती केवळ 98 श्रीमंतांकडे आहे. ती 49 लाख कोटी रुपये इतकी आहे.
  • देशातील 142 अब्जाधीशांकडे 53 लाख कोटी रुपये आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post