अथणी येथून पुण्याला जाणारा 33 लाखांचा गुटखा मिरजेतील गांधी चौकी पोलिसांनी जप्त केला

 पकडलेला गुटखा हा पुण्यात कुठे देणार होते याची माहिती पोलीस घेत आहेत.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कर्नाटकातील अथणी येथून पुण्याला जाणारा 33 लाखांचा गुटखा मिरजेतील गांधी चौकी पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे ट्रकमध्ये भुशाच्या पोत्यांआडून या गुटख्याची वाहतूक केली जात होती.पोलिसांनी 33 लाखांचा गुटखा व आयशर ट्रक असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोनजणांना अटक केली आहे. दाऊल इकबाल मुल्ला (वय 26, रा. मलाबाद, ता. अथणी, जि. बेळगाव), हसन आप्पासाहेब सनदी (वय 30, रा. जकारहट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कर्नाटकातील अथणी येथून आयशर ट्रकमधून गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू पुण्याला जाणार असल्याची माहिती डीबी पथक व गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. हा ट्रक मिरजेतून जाणार असल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे गांधी चौकी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. राजधानी हॉटेलसमोरून जाणाऱ्या आयशर ट्रकला थांबवून झडती घेतली असता ट्रकच्या पाठीमागील बाजूला भुसा भरलेली पोती ठेवण्यात आली होती. भुसा भरलेल्या पोत्यांच्या मागील बाजूस पांढऱ्या पोत्यांमध्ये गुटखा आढळून आला. ट्रकमध्ये हसन सनदी यांच्या मालकीचा पान मसाला व सुगंधी तंबाखू असा माल असून, कर्नाटक मधून हा माल भरून पुणे येथे जात असल्याचे ट्रक चालकाने सांगितले.

ट्रकमधून एका पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पोत्यात 25 लाख 20 हजार रुपयांचा हिरा पान मसाल्याचे 105 पाऊच, प्रत्येक पाऊचमध्ये 32 पुडय़ा अशा 200 पोत्यांमध्ये 21 हजार पाऊच, तसेच दुसऱ्या पोत्यात 6 लाख 30 रुपयांचा रेलॉय 717 सुंगधी तंबाखूचे 105 बॉक्स, प्रती बॉक्समध्ये 30 पुडय़ा, असे 200 पोती, तसेच 8 लाख 800 रुपयांचा रत्ना छाप तंबाखू, 16 लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक व इतर साहित्य असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पकडलेला गुटखा हा पुण्यात कुठे देणार होते याची माहिती पोलीस घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, कुमार पाटील, सहायक फौजदार सुभाष पाटील, सहायक फौजदार उदय कुलकर्णी, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत गायकवाड, दुष्यंत ढेंबरे, सलीम शेख, पोलीस नाईक सूरज पाटील, अंमलदार बाळासाहेब निळे, अमोल आवळे, गणेश कोळेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post