प्रेस मीडिया ऑनलाइन :
मुंबई क्राइम ब्रँचमधून आलोय, तुमच्याकडे चुकीच्या व्यवसायातून मिळवलेली रोकड आहे. आमच्यासोबत क्राइम ब्रँचच्या कार्यालयात चला, अन्यथा येथेच तुम्हाला बेडय़ा ठोकू अशी बतावणी करत एका बडतर्फ पोलिसाने त्याच्या अन्य तिघा सहकाऱ्यांच्या मदतीने व्यावसायिकाचे एक लाख रुपये लुटून नेले.मात्र गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने त्या चौघांनाही बेडय़ा ठोकल्या.
पायधुनी परिसरात तक्रारदार व्यावसायिकाचे प्रोव्हिजनल स्टोअर्स आहे. गुरुवारी दुपारी ते दुकानात बसलेले असताना दोन परिचयाच्या व्यक्ती त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी व्यावसायिकाकडे चार लाख 10 हजारांची रोकड थोडय़ा वेळासाठी ठेवण्यास देऊन निघून गेले. त्यानंतर 2020 मध्ये पोलीस दलातून बडतर्फ केलेले चंद्रकांत गवारे हा त्याच्या अन्य तिघा सहकाऱ्यांसह व्यावसायिकाकडे गेला. गवारे व सोबत असलेल्या एकाने पोलीसचा लोगो असलेला मास्क लावला होता. तर उर्वरित दोघे दुकानाबाहेर उभे राहिले. आम्ही क्राइम ब्रँचमधून आलो असून तुमच्याकडे चुकीच्या व्यवसायातून रोकड आलेली असून तुम्हाला आमच्यासोबत क्राइम ब्रँचच्या कार्यालयात यावे लागेल. तसेच तुम्हाला अटक करावी लागेल असे बोलू लागेल. त्यावर माझ्याकडे असलेली रक्कम ओळखीच्या व्यक्तींनी ठेवायला दिली असल्याचे सांगितले. मात्र गवारे व त्याचे साथीदार काहीएक ऐकायला तयार नव्हते. अटक झाली तर परिसरात इज्जत जाईल या भीतीपोटी व्यावसायिकाने गवारेकडे एक लाख दिले. ते पैसे घेऊन गवारे व त्याचे साथीदार तेथून निघून गेले.
याबाबत आजूबाजूला चर्चा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पायधुनी पोलिसांत जाऊन तक्रार दिली. त्यानंतर उपायुक्त निलोत्पर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक श्रीमंत शिंदे व त्यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यातील एक आरोपी हा बडतर्फ पोलीस चंद्रकांत गवारे असल्याचे निष्पन्न झाले. मग त्यानुसार शिंदे व त्यांच्या पथकाने कसून तपास करीत गवारे व त्याचे साथीदार ज्ञानेश्वर कुटे, योगेश लाड आणि कुंदन कदम अशा चौघांना अटक केली.