मुरगूड पोलिसांनी शिक्षक अमित कुंभार याला अटक केली
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कागल तालुक्यातील आकांक्षा नावाच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे.याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात मुरगूड पोलिसांनी शिक्षक अमित कुंभार याला अटक केली आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी शिक्षक अमित कुंभार आकांक्षाला गेल्या दीड महिन्यापासून त्रास देत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने तिच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. फोन करून तसेच मेसेज करून तो तीला त्रास देत होता. 'तु लग्नासाठी होकार दिलास तर, मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन' असे मेसेज पाठवायचा.
या सर्व प्रकारामुळे 22 जानेवारी रोजी आकांक्षाने कुभारच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, 27 जानेवारी रोजी आकांक्षाने, 'मी अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समोर दिला होता.' मात्र, उपचार सुरू असतानाच काल दुपारी तिचा मृत्यू झाला आहे. आकांक्षाने दिलेल्या जबाबानुसार मुरगूड पोलिसांनी कुंभार याला गुरुवारी ताब्यात घेतले होते. काल सांयकाळी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.