शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर..
प्रेस मीडिया ऑनलाइन :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेत शिवसेना पॅनेलचा झालेला विजय हा दाद देणारा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिके सह सहकारातील सर्व निवडणुका लढविण्यासाठी सज्ज राहावे,' असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत शिवसेना, शेकाप, आणि रिपाइं पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात आयोजित विजयी मेळाव्यात संपर्कप्रमुख दुधवडकर यांच्या हस्ते शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख, खासदार संजय मंडलिक, अर्जुन आबिटकर आणि बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, सुरेश साळोखे, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, शेकापचे बाबासाहेब देवकर उपस्थित होते.
दुधवडकर म्हणाले, 'महाविकास आघाडी म्हणून मित्राकडे सन्मानाने मागितलेली जागा राक्षसी वृत्तीची कशी काय असू शकते? उलट मतदारांनीच तीन जागा निवडून दिल्या. त्यामुळे जिल्हा बँकेतील शिवसेना पॅनेलचा हा विजय दाद देणारा आहे. अधिकारवाणी गाजविणाऱयांना दणका देणारा आहे. 'शिवसेनेला जागा दिल्या तर पडतील,' असे म्हणणाऱयांनी याचा विचार करावा. यापुढेही अशाच पद्धतीने वागल्यास असेच होईल,' असा सूचक इशाराही अरुण दुधवडकर यांनी दिला.
कोल्हापूर जिह्यातील येणाऱया सर्व निवडणुकांत शिवसैनिक विरोधकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. तर, स्वार्थी नेत्याविरोधात हा स्वाभिमानी विजय आहे. 'आम्ही म्हणू तेच खरे' हे ठरविणारी प्रवृत्ती थांबणे काळाची गरज असून, त्यासाठी भगवा फडकणे गरजेचे असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले.
आता आमचं नवीन ठरलंय! - खासदार संजय मंडलिक
जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेसाठी तीन जागा मागितल्या होत्या; पण दोनच जागा देण्याचा सत्ताधाऱ्यांचा अट्टहास होता. कौरवांनी पांडवांना सुईच्या टोकाएवढीसुद्धा जागा देणार नसल्याचे सांगितल्यानंतर महाभारत झाले. त्याचा दाखला देत कोल्हापुरातही जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत तिसऱ्या जागेवरून महाभारत घडल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले. निवडणुकीत आमचे तीन निवडून आले. बाकीचे पडले नाहीत, तर ते लढले. जिल्ह्यात यापुढे शिवसेनेचे सहाच्या सहा आमदार पुन्हा निवडून आणण्याचा निश्चय केला असून, 'आमचं ठरलं' म्हणून बाजूला झालेलो नाही; पण आता 'आमचं नवीन ठरलंय' अशी टॅगलाइन देत खासदार संजय मंडलिक यांनी जिह्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे.