छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर)मधील 28 हून अधिक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
प्रेस मीडिया ऑनलाइन :
मुरलीधर कांबळे :
कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हजारो रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारी जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणाच तिसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडू लागली आहे.छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर)मधील 28 हून अधिक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, या सर्वांना सौम्य लक्षणे असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हजारो रुग्णांना जीवदान देण्यात सीपीआर रुग्णालयाचे मोठे योगदान आहे. याशिवाय म्युकरमायकोसिस रुग्णांवरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ओमायक्रॉनपाठोपाठ कोरोना संसर्गाची तिसरी लाट पसरू लागली आहे. त्यातच या कचाटय़ात सीपीआरची आरोग्य यंत्रणाच सापडली आहे. सीपीआरचे डॉक्टर तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, असे एकूण 28 जण बाधित आहेत. या बाधितांमध्ये 6 प्राध्यापक, 4 निवासी डॉक्टर आणि एका परिचारिकेचा समावेश आहे.
या सर्वांमध्ये सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. तर विलगीकरणाची घरी सोय नसलेल्या पाचजणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती 'सीपीआर'चे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी दिली.
बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता
या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या जास्त असून सर्दी, ताप, खोकला अशी सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे सीपीआरच्या आरोग्य यंत्रणेतील अनेकांनी आपले नमुने तपासणीसाठी दिले आहेत. यातून एकीकडे बाधितांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज असला तरी रुग्णांमधील सौम्य लक्षणे पाहता चिंता करण्याचे कारण नसल्याचे अधिष्ठाता दीक्षित यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सतर्क
शहरातील आरोग्य यंत्रणेत कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेत तो झालेला नाही. तरीसुद्धा ग्रामीण भागात सर्व आरोग्य केंद्रांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यासाठी आपण स्वतः ग्रामीण भागात भेट देत पाहणी करणार आहोत. ज्या-त्या भागात आरोग्य केंद्र आणि कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी दिली.