आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेसने वर्चस्व राखले असले, तरी शिवसेनेला एक जागा देण्यावरून पडलेल्या ठिणगीने जिल्ह्याच्या एकतर्फी राजकारणाला सुरुंग लावला आहे.दोन्ही सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत भाजप, जनसुराज्य आघाडीने 21 पैकी 17 जागांवर बाजी मारली असली, तरी शिवसेना, शेकाप व रिपाइं पुरस्कृत आघाडीने 3 जागांवर बाजी मारून सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिला आहे. दरम्यान, अपक्षाला एकच जागा मिळाली आहे. तर, खासदार संजय मंडलिक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने हे प्रमुख विजयी झाले असून, शिवसेनेचे अर्जुन आबीटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव केला.
कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदललेली पाहावयास मिळाली. प्रथम तालुका सेवा संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सहा जागा बिनविरोध झाल्या. शिवसेनेला एक जागा देताना सत्ताधाऱ्यांनी चालढकल केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ज्यांना नाकारले त्यांनाच सोबत घेऊन शिवसेनेने खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल करून ही निवडणूक लढवली. 15 जागांसाठी 33 उमेदवार जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या निवडणुकीत रिंगणात उतरले होते. यासाठी अत्यंत चुरशीने असे सरासरी 99 टक्के मतदान झाले होते.
आज झालेल्या मतमोजणीत सत्ताधाऱ्यांचा विजय झाला असला, तरी त्यांना आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे. शिरोळ तालुक्यात हायव्होल्टेज लढतीत विकास सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपत पाटील यांचा पराभव केला. यड्रावकर यांना 149 पैकी 98 मते मिळाली. गडहिंग्लजमधून विद्यमान संचालक व उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांना फक्त 6, तर संतोष पाटील यांना 100 मते मिळाली. पन्हाळ्यातून विद्यमान संचालक आमदार विनय कोरे विजयी झाले. शाहूवाडीतून विद्यमान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर यांचा अपक्ष रणवीरसिंह गायकवाड यांनी पराभव केला. भुदरगडमधून रणजितसिंह पाटील विजयी झाले. आजऱ्यात विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा पराभव झाला, तर सुधीर देसाई विजयी झाले.
नूतन संचालक मंडळ
तालुका सेवा संस्था गट - सहाजण बिनविरोध : कागल - हसन मुश्रीफ, गगनबावडा - सतेज पाटील, करवीर - पी. एन. पाटील, चंदगड - राजेश पाटील, राधानगरी - ए. वाय. पाटील, हातकणंगले - अमल महाडिक. आज निवडून आलेले संचलक - शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर, पन्हाळा - विनय कोरे, शाहुवाडी - रणवीरसिंह गायकवाड (अपक्ष), भुदरगड - रणजितसिंह पाटील, आजरा - सुधीर देसाई, गडहिंग्लज - संतोष पाटील. प्रक्रिया गट - खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर. पतसंस्था गट- अर्जुन आबीटकर. इतर शेती संस्था गट - प्रताप माने. इतर मागासवर्गीय - विजयसिंह माने. भटक्या विमुक्त जाती-जमाती - स्मिता गवळी. अनुसूचित जाती - आमदार राजू आवळे. महिला गट - माजी खासदार निवेदिता माने आणि ऋतिका काटकर.
शिवसेनेचे विजयी उमेदवार - खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आणि अर्जुन आबीटकर.
मागून मिळाले नाही, ते आम्ही जिंकून घेऊन दाखवले
सन्मानाने मागितले; पण मिळाले नाही. तेच आता जिंकून दाखवले. त्यामुळे जिल्ह्यासह बँकेच्या सत्ताकारणातसुद्धा शिवसेना किंगमेकर असेल. बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो, तरी पक्षाच्या आदेशानुसार पुढील भूमिका राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत खासदार संजय मंडलिक यांनी अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण केली आहे. तीन जागा दिल्या असत्या तर जिल्हा बँक बिनविरोध झाली असती. पण सत्तारुढ गटाने आम्हाला लढायला लावले. मागून मिळाले नाही, ते आम्ही जिंकून घेऊन दाखवले असेही ते म्हणाले. गेल्या सहा वर्षांत संचालक असलेले आपल्या संपर्कातील आताही संपर्कात येत असून, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेना आघाडीसोबत राहणार असल्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक देशात अग्रस्थानी आणू
सत्तारूढ आघाडीचा हा विजय म्हणजे गेल्या सहा वर्षांत शेतकरीभिमुख, कल्याणकारी कारभारास मतदारांनी दिलेली पोचपावती आहे. यापुढे सर्व संचालक मंडळ एकोप्याने शेतकऱ्यांच्या हिताचा व कल्याणाचा कारभार करू. जिल्हा बँक देशात अग्रस्थानी आणू. तसेच, जिह्यातील शेतकऱ्यांच्या दारापर्यंत ही बँक पोहोचवू, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्या आबीटकरांकडून विद्यमान संचालकांसह आमदारांचा पराभव
कृषी, पणन व शेतीमाल प्रक्रिया गटातून खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर विजयी झाले. खासदार मंडलिक यांना 306, तर आसुर्लेकर यांना 331 मते मिळाली. नागरी बँका आणि पतसंस्था गटात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे अर्जुन आबीटकर यांनी विद्यमान संचालक अनिल पाटील यांच्यासह सत्ताधारी आघाडीचे आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव केला. एकूण 1 हजार 221 मतदारांपैकी आमदार आवाडे यांना 461, अनिल पाटील यांना 106, तर आबीटकर यांना 614 मते मिळाली. तर, इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट-प्रताप माने, इतर मागासवर्गीय -विजयसिंह माने, भटक्या विमुक्त जाती-जमाती- स्मिता गवळी, अनुसूचित जाती, जमाती-आमदार राजू आवळे, महिला राखीव गट - माजी खासदार निवेदिता माने आणि ऋतिका काटकर हे विजयी झाले.