जुना राजवाडा पोलिसांत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला .
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकारी महिलेला एका बडतर्फ पोलीस महिलेकडून गोळ्या घालण्याची धमकी देत अर्वाच्य शिवीगाळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहाच्या बाहेर गेटजवळ शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तुरुंगाधिकारी मीरा विजय बाबर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून संबंधित बडतर्फ महिला पोलीस उज्ज्वला झेंडेसह, साथीदार बंगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात प्रेमाच्या त्रिकोणातून खळबळ उडवून दिलेल्या व त्यानंतर बडतर्फीची कारवाई झालेल्या उज्ज्वला झेंडे या महिलेचा मुलगा कळंबा कारागृहात बंदी आहे. कारागृहाच्या तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे गोळीबार प्रकरणाची माहिती विचारल्याची माहिती मुलाने त्याची आई उज्ज्वला झेंडे हिला दिली. त्यानंतर 1 जानेवारी रोजी दुपारी उज्ज्वला झेंडे व तिची साथीदार बंगे नावाची व्यक्ती असे दोघे कारागृहाच्या बाहेर गेटजवळ सर्वसामान्य लोकांना थांबण्यास मनाई असलेल्या ठिकाणी थांबले होते. यावेळी तुरुंगाधिकारी मीरा बाबर यांनी त्यांना तुम्ही का आला आहात, अशी विचारणा केली. यावेळी झेंडे यांनीही 'मुलाकडे गोळी कोणी मारली असे का विचारले' म्हणून वाद घातला. 'माझ्यात गोळ्या घालण्याची हिंमत होती म्हणून गोळ्या घातल्या आहेत. अजूनही मी गोळ्या घालू शकते', अशी धमकीही दिली.
दरम्यान, तुरुंगाधिकारी बाबर यांनी झेंडे व तिच्या साथीदारांना या ठिकाणी थांबू नका, निघून जा असे सांगितल्यानंतर झेंडेने त्यांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. तुरुंगाधिकाऱयांशी गैरवर्तन केल्याबद्दल या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पुजारी तपास करीत आहेत.