प्रेस मीडिया ऑनलाइन :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा थाट व रुबाब आजच्या लाचलुचपतच्या कारवाईने उतरला आहे. आता या प्रकरणाशी संबंधित चौकशी खोलपर्यंत होण्याची गरज आहे. या प्रकाराने केवळ 'एलसीबी'ची नव्हे तर पोलिस दलाचीच बेअब्रू झाली आहे.
संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र या विभागाचे प्रमुख तर प्रती पोलिस अधीक्षक. कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाऊन कारवाईचे अधिकार. काही किचकट गुन्ह्यांचा तपासही या विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत; पण चौकशीच्या नावाखाली लोकांना त्रास देणे, त्यांच्याकडून खंडणी उकळणे अशा प्रकारामुळे हा विभागाच बदनाम झाला आहे. पोलिस दलाचे नव्हे तर पोलिस अधीक्षकांचे हा विभाग म्हणजे 'नाक'. पण आजच्या कारवाईने हे नाकच कापले गेले. या विभागातील काही ठराविक जणांची मक्केदारी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पोलिस दलातील बहुंताशी कर्मचाऱ्यांनी या विभागाची पायरीही चढलेली नाही. आज ना उद्या या विभागात काम करण्याची संधी मिळेल म्हणत काही कर्मचारी निवृत्त झाले. पण, या विभागाकडे काम करणाऱ्या काहींनी तालुक्यात राहू दे शहरा बाहेरच्या पोलिस ठाण्यातही काम केलेले नाही. या विभागाचे 'महत्त्व' लक्षात घेऊन तिथे बदली साठी थेट मंत्र्यांपर्यंत 'फिल्डिंग' लावली जाते. त्यातूनच काही जण दहा बारा वर्षांपासून या विभागात आहेत. कागदोपत्री अशांची बदली दाखवायची; पण 'प्रतिनियुक्ती' या गोंडस नावाखाली पुन्हा याच विभागात कार्यरत रहायचे असा एक नियमच काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तयार झाला आहे.
साहेबांच्या घरातील काम करणारा वर्षानु वर्षे तोच, साहेबांच्या कार्यालयातील फोटोला रोज हार घालणारा तोच, महत्त्वाची जबाबदारी असलेलेही तेच. त्यातून या कर्मचाऱ्यांना हवे ते करण्याची सवय लागली आहे. याच विभागातील एक कर्मचारी रात्रभर एका जुगार अड्ड्यावर बसून असतो. या विभागाला मात्र शहरात असलेल्या अड्ड्यावर कारवाईला वेळ मिळत नाही. या विभागातून बदली झालेला व कामगिरीत 'यशवंत' असलेला एक कर्मचारी तर बदलीच्या ठिकाणी हजरच झाला नाही. काही ठराविकांना एक न्याय आणि या विभागातील कर्मचाऱ्यांना एक न्याय यामुळेच आजच्या कारवाईनंतरही कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. काही अधिकाऱ्यांनी पडकलेल्या दोन कर्मचाऱ्यांविषयी व्यक्त केलेला रोष पाहता आता या विभागाच्या साफ सफाईची गरज आहे. पोलिस अधीक्षक त्यात लक्ष घालतील एवढीच अपेक्षा आहे.
आजपर्यंत लाचलुचपत विभागाने अशा तृत्तीय, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. पण, हे कर्मचारी एवढ्या मोठ्या रकमेची मागणी कोणासाठी करतात तिथेपर्यंत अपवादानेच लाचलुचपत विभाग पोहचला. या कारवाईनंतरही या विभागाने तळापर्यंत चौकशी केली तर मोठे मासेही गळाला लागण्याची शक्यता आहे; पण चौकशी खोलपर्यंत होणार का? हा खरा प्रश्न आहे.