नववर्ष स्वागताची बहारदार गझल -काव्य मैफिल
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर ता.४, नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोल्हापूर येथे सुभाषजी नागेशकर यांच्या कलादालनात गझलकार प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली 'गझल - काव्य मैफल ' संपन्न झाली.या मैफलीचे आयोजन गझलसाद, गझल प्राविण्य व शब्दवैभव साहित्यमंच या समूहांचे प्रशासक प्रा.नरहर कुलकर्णी, प्रवीण पुजारी आणि वैभव चौगुले यांनी केले होते. 'कविता जशी काळजाला भिडावी लागते तशीच गझल मनात रुजावी लागते असे स्पष्ट करत प्रसाद कुलकर्णी यांनी गझल - कविता लेखन व सादरीकरणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
'सरणाऱ्या वर्षाला निरोप देऊ' या गझलेने सारिका पाटील यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर 'धुंदल्या रात्रीत माझ्या स्पर्शणारा चांदवा तू (सीमा पाटील), रात्र निज म्हणते डोळे मिटत नाही (वैशाली पाटील),तोडुनी हिन स्त्रीदास्यत्व बेडी क्रांतीज्योतीने घडविला बदल (कुमुदिनी मधाळे), तुझ्या ठायी विठ्ठला रे माझ्या ओवीचा विसावा (आनंद हरी),आज गूज सांगते कानात वारा जरा ऐक ना (सई माईनकर),यादे कशा गुलाबी होतील पाहू या चल (वैभव चौगुले),दुकानात मी लग्नानंतर आता फे-या घालतो (प्रवीण पुजारी),जाणार तर जा मित्रा तुझ्याविना सुखी नाही मित्रा (दस्तगीर नदाफ), असेच होते तुला भेटता विसरून जातो (नरहर कुलकर्णी),हीच सदिच्छा उरी जपावी नवीन वर्षी (प्रसाद कुलकर्णी), कशाला सांग कोणाची चाकरी आता (डॉ.संजीवनी तोफखाने),वेदनेला अंत नाही सौख्य जातिवंत नाही (डॉ दयानंद काळे)अशा मनाला भावणाऱ्या व मनात घर करणार्या कविता व गझला या मौफलीत सादर झाल्या. अडीच तास चाललेल्या मैफिलीत सर्व रसाच्या कविता - गझला सादर करण्यात आल्या.