नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या गुन्हेगाराला पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना आलेलं मोठे यश...
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : अडीच वर्षे फरारी असलेला इचलकरंजीतील माजी नगरसेवक संजय तेलनाडे याला कोल्हापूर पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या. त्याच्या नावावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी असे १७ गुन्हे असून त्याच्या एसटी गँगवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या गुन्हेगाराला पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना आलेले मोठे यश असल्याचे व महत्त्वाचं मानलं जात आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तेलनाडेच्या अटकेची माहिती पत्रकार परिषदेत दिली. इचलकरंजीत भूमाफिया असलेला नगरसेवक संजय तेलनाडे हा ‘एसटी सरकार गँग’च्या नावावर संघटीत गुन्हेगारी करत होता. १८ मे २०१९ मध्ये संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ माजी नगरसेवक सुनील तेलनाडे यांच्यासह त्यांच्या गँगवर पोलिसांनी मोक्काखाली गुन्हा दाखल केला होता. या गँगमध्ये एक वकीलही होता.
पोलिसांनी गँगमधील काही सदस्यांना बेड्या ठोकल्या, पण तेलनाडे बंधू फरार होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेत जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस तेलनाडे बंधूचा शोध घेत होते. तो नेपाळ, दुबईमध्ये असल्याचे बोलले जात होते. गेली अडीच वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय तेलनाडे पुण्यातील आंबेगाव येथे येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने पुण्यातील दत्तनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशिष कवठेकर आणि पोलिस हवालदार साठे यांच्या सहकार्याने आंबेगाव येथील फ्लॅटवर छापा टाकून त्याला अटक केली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्याची आई व नातेवाईक होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, उत्कर्ष वझे, पोलिस हवालदार रणजीत पाटील, बालाजी पाटील, संजय इंगवले, अमर शिरढोणे, श्रीकांत मोहिते, रणजीत कांबळे, प्रशांत कांबळे, सूरज चव्हाण, उत्तम सडोलीकर, महादेव कुऱ्हाडे यांनी कारवाईत भाग घेतला.