माजी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी यांची माहिती..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरात सांगली नाका परिसरातील नगरपरिषद मालकीच्या आरक्षित खुल्या जागेमध्ये मल्टिपर्पज हॉल व बसवेश्वर उद्यान विकसित करण्यास नगरोत्थानमधून जिल्हाधिकार्यांकडून मान्यता मिळाली आहे.यामध्ये 1 कोटी 36 लाख 53 हजार 939 रुपये खर्चातून उद्यान विकसित करणे अंतर्गत कंपौड करणे, मल्टीपर्पज हॉल बांधणे अशी कामे होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी दिली.
इचलकरंजी शहरात लिंगायत समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी समाजाकडून सातत्याने केली जात होती. त्यासाठी उत्कर्ष लिंगायत समाजाने सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. याबाबत माजी नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे मागणी करत योग्य कागदपत्रांची पूर्तता करत पाठपुरावा केला. त्याला यश आले असून नगरपरिषदेच्या आरक्षित खुल्या जागेमध्ये मल्टिपर्पज हॉल व बसवेश्वर उद्यान विकसित करण्यास नगरोत्थानमधून जिल्हाधिका-यांनी मान्यता दिली आहे. इचलकरंजी शहरातील सांगली नाका परिसरात
नगरपरिषदेच्या आरक्षित खुल्या जागेमध्ये बसवेश्वर उद्यान विकसित करणे अंतर्गत कंपौड करणे, मल्टीपर्पज हॉल बांधणे या कामासाठी 1 कोटी 36 लाख 53 हजार 939 रुपये इतक्या रक्कमेस नगरोत्थान जिल्हास्तरामधून जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
या कामामुळे परिसरातील अबालवृध्दांना उद्यानाचा लाभ होणार असून भागात सुसज्ज उद्यान विकसित होणार आहे. या कामी इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील,माजी नगरसेवक युवराज माळी त्याचबरोबर मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल आणि कोल्हापूर प्रशासन यांचे सहकार्य लाभल्याचे माजी नगराध्यक्षा अँडव्होकेट सौ.अलका स्वामी यांनी सांगितले.