प्रेस मीडिया ऑनलाइन :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
इचलकरंजी गेले जवळ-जवळ अर्धशतक सामाजिक कार्यात सहभागी असलेले पदकी कुटुंब म्हणजे समाजसेवेचं आगळवेगळं उदाहरण आहे. या कुटुंबातील शंकर नारायण पदकी हे वयाच्या ७३ व्यावर्षी १९ जानेवारी २०२२रोजी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने कालवश झाले. यांचे ज्येष्ठ बंधू डॉ.एस.एन.पदकी काही वर्षांपूर्वी निवर्तले.तसेच एक बहीणही गेली.तीन भाऊ आणि दोन बहिणी असे पाचहीजण अविवाहित राहून अखंड समाजसेवेचे काम करत होते.हे दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरण होते.आज रंगनाथ व कृष्णाबाई ही अनुक्रमे ७६ व ८० वर्षाची भावंडे वृद्धापकाळाने त्रस्त आहेत.शंकर पदकी यांच्या निधनाने पदकी कुटुंबाचे समाजसेवेचे काम थांबले आहे. या पण या कुटुंबाने निरपेक्ष वृत्तीने ,साधेपणाने ,सातत्याने सामाजिक काम कसे करता येते याचे उत्तम उदाहरण घालून दिलेले आहे.
पन्नास - पंचावन्न वर्षांपूर्वी कर्नाटकातून इचलकरंजीत आलेले हे कुटुंब कामगार ,कष्टकरी वर्गाला आहार-आरोग्य कला या विषयाचे लोकशिक्षण देण्यासाठी कार्यरत झालं. डॉ.पदकी एज्युकेशन सोसायटी ही संस्था त्यांनी स्थापन केली. त्या आधारे लोकप्रबोधन, जनजागरण याचे काम सुरू केले.रक्तदान,लैंगिक शिक्षण,बाल आरोग्य,महिला आरोग्य,व्यसनाधीनता,क्षयरोग ,एड्स, जटा निर्मूलन,अंधश्रद्धा निर्मूलन,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे,लघुउद्योग मार्गदर्शन, मनोविकार प्रबोधन,अंधत्व निवारण, सुसंस्कार शिबीर,गरोदर माता प्रबोधन,बाल विकास,व्यक्तिमत्त्व विकास,पुष्पकला- हस्तकला अशा असंख्य विषयावर पदकी बंधू व्याख्याने, भित्ती पत्रके ,स्लाईड शो,माहितीपत्रके,चर्चासत्रे या माध्यमातून महाराष्ट्रात व कर्नाटकात कार्यरत राहिले. कारखाने,सूतगिरण्या,शाळा,महाविद्यालये,मंदिरे,मठ, सरकारी दवाखाने,कामगार कल्याण केंद्रे,महिला मंडळे, तरुण मंडळे,सामाजिक संस्था अशा विविध ठिकाणी ते अखंड कार्यरत राहिले.केंद्र सरकार व राज्य सरकारचे आरोग्य ,अन्न व औषध,महिला व बालकल्याण ,उद्योग अशा विविध मंत्रालयांसह सिरम इन्स्टिट्यूट सह विविध मान्यवर संस्थांचे उपक्रम त्यांनी निस्वार्थी भावनेने अनेक दशके लोककल्याणासाठी चालविले.
दोन हजारांहून अधिक प्रबोधन कार्यशाळा, शिबिरे ,प्रदर्शने यांचे आयोजन त्यांनी केले होते. कॅनडाच्या इंटरनॅशनल अकॅडमीने त्यांच्या कार्याची' डॉक्टरेट 'हा सन्मान प्रदान करून दखल घेतली होती.तसेच राज्य व केंद्र सरकारच्या जनजागरण अभ्यासक्रमात पदकी बंधूंच्या कार्याची दखल घेतली होती.त्यांना पन्नासावर पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.डॉ.एस.एन.पदकी व शंकर नारायण पदकी ही वेडं होऊन समाजकार्य करणारी भावांची जोडी नेहमी सायकलवर दिसायची.मध्यम उंची व बांधा,पांढरी विजार शर्ट,वाढलेली दाढी आणि अखंड उपक्रमात व्यग्र हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कार्याचे महत्व ज्यांना कळत नव्हते आणि ते समजून घेण्याची ज्यांची कुवत नव्हती ते पदकी बंधूंची टिंगल टवाळीही करत असत. पण आपल्या कमालीचा साधेपणाने पदकी बंधूनी या टवाळखोरांकडे दुर्लक्ष करत अखंड काम केले. कारण जीवनाचा अर्थ त्यांना गवसला होता. पदकी बंधूंच्या या लोकजागरणाचे महत्व ओळखून इचलकरंजीतील रोटरी क्लब ,लायन्स क्लब, समाजवादी प्रबोधिनी ,मनोरंजन मंडळ ,इचलकरंजी नागरिक मंच आदी अनेक संस्थांनी आणि कर्नाटकातील काही संस्थांनी पदकी बंधूंच्या कार्याला नेहमीच सहकार्य केले. साधेपणातून मोठी समाजसेवा कशी करता येते व समाजसेवेची क्षेत्रे किती विस्तारित असू शकतात हे पदकी बंधूनी व्रतस्थपणे दाखवून दिले.
अखंड कामाचा ध्यास घेतलेले पदकी बंधू अतिशय स्पष्टवक्ते होते. कमालीचे बोलके होते पण अतिशय नम्र होते. इतरांच्या समाजकार्याबद्दल त्यांना आदर होता.तसेच त्यांची सहनशीलताही मोठी होती. नगरपलीकेच्या रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण विरोधी आवश्यक पण एका अत्यंत बेजबाबदार पद्धतीने केलेल्या कारवाईत त्यांच्या कार्याचा, उपक्रमांचा मौलिक पत्रव्यवहार ,कात्रणे ,फाईल्स ,स्लाईड, भित्तिचित्रे ,पुस्तके,इतिहास नामशेष झाला.पदकी यांना पूर्वकल्पना दिली असती ,अथवा नगरपालिकेच्याच मालकीच्या नाक्यातील तो दस्तऐवज सुरक्षित बाजूला काढून ठेवला असता व त्यांच्याकडे सुपूर्द केला असता तर अर्धशकाची समाजसेवा कागदपत्रांद्वारे तरी पुढील पिढ्याना कळाली असती. आणि इचलकरंजीतील एका निस्पृह समाजसेवक कुटुंबाचे कार्य लिखित रूपाने नोंदवता आले असते.पण जेसीबीच्या सहाय्याने केलेल्या पाडापाडीत आपण काय पाडतो आहोत आणि काय गाडतो आहोत याचे व्यवस्थेने भान ठेवले नाही.ते ठेवले गेले असते पदकी बंधूनी केलेल्या कार्याची सलग नोंद ठेवणे,त्यापासून इतरांना प्रेरणा घेणे शक्य झाले असते.
डॉ.पदकी आणि शंकर पदकी यांनी आपल्या कार्याचा इतिहास अन्यत्र लिहून ठेवला असण्याची शक्यता कमी आहे.पण जर ठेवला असेल तर तो संपादित करण्याची गरज आहे.किमान पदकी कुटुंबाच्या कार्याच्या,उपक्रमांच्या काही आठवणी असतील तर त्या एकत्र करणेही महत्वाचे ठरणार आहे.पदकी बंधू यांच्या संबंधातील आलेले लेख ,बातम्या ,फोटो यांचे संकलन करता आले तर ते एका जीवनव्रती समाजसेवी कुटुंबाला न्याय देणारे ठरेल आणि पुढील पिढ्याना प्रेरणा देणारेही ठरेल. शंकर पदकी यांच्या निधनानंतर अशी अनौपचारिक चर्चा करतांना हे काम पदकी यांना अखेरपर्यंत साथ देणारी व शंकर पदकी यांना ममत्व असणारी इचलकरंजी नागरिक मंच (इनाम ) या संस्थेच्या वतीने करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे डॉ.पदकी एज्युकेशन संस्था ,पदकी बंधू यांचे कार्य याबाबतची ज्यांच्याकडे माहिती असेल त्यांनी अभिजित पटवा (९९२१६ ००८००) यांच्याशी संपर्क साधावा.योग्य व पुरेशी माहिती आली तर त्याचे योग्य संपादन करून ते प्रकाशित केले जाईल असा इचलकरंजी नागरिक मंचचा मानस आहे.तेंव्हा ज्यांच्याकडे अशा स्वरूपाची माहिती असेल त्यांनी ती द्यावी व एका जीवनव्रती कार्याच्या नोंदीला सहकार्य करावे ही नम्र विनंती.