प्रेस मीडिया वृत्तसेवा :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८ ५०८ ३० २९० )
मा.पंतप्रधानांची १३ जानेवारी २२ रोजी कोरोना मुकाबला धोरणाच्या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधला ही चांगली बाब आहे. त्यावेळी ते म्हणाले ,' कोरोनाला रोखताना अर्थव्यवस्थेचा आणि सर्वसामान्य माणसांचाही विचार करा.कोरोना विरोधातील रणनीती तयार करताना निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊ नये याची दक्षता घ्या.' मा. पंतप्रधानांचे हे मत अतिशय योग्य आहे.पण त्याला मानभावीपणाची किनार आहे.कारण हे बोलतांना त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली असती तर ते प्रतिमा उंचावणारे ठरले असते. कारण त्यांनी मार्च २०२० मध्ये अतिशय नाटकीय, धक्कादायक,चुकीच्या पद्धतीने अचानक लॉक डाऊन जाहीर केला. इतक्या मोठ्या देशामध्ये लॉकडाऊन सारखा निर्णय नोटाबंदीसारख्या आतताई पद्धतीने आणि फिल्मी स्टाइलने जाहीर करणे अत्यंत चुकीचे होते. दोन - चार दिवसांची मुदतही मोठे उधवस्तीकरण थांबवू शकले असते.पण चार तासात अख्खा देश बंद. कोणीही जागेवरून हलू नये. ही कोणत्या दूरदृष्टीची निर्णयप्रक्रिया होती ? मुळात कोरोनाचे संकट ओळखायलाच आम्ही प्रचंड विलंब केला होता. हे संकट येणार असे जे सांगत होते त्यांना मूर्ख आणि पप्पू ठरवण्यात धन्यता मानली जात होती.अचानक लॉकडाऊन जाहीर केला
त्यावेळी बाहेरगावी व परराज्यात असलेले करोडो नोकरदार, मजूर, कामगार,नागरिक काय करतील ? त्यांच्या कुटुंबीयांचे काय होईल ?याचा सारासार विचार केला गेला नव्हता. देशातील बारा ते पंधरा कोटी जनता आपल्या घरापासून दूर होती. आणि आम्ही सांगत होतो आहे तिथेच थांबा. थांबणे किती काळ ? हे आम्हालाही माहिती नव्हते.ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांची काय व्यवस्था केली आहे ?याचे एक टक्काही उत्तर नसतांना आपण लॉकडाऊन जाहीर केला. या निर्णयाने कित्येकांचे बळी गेले. लहान-मोठे रोजगार बंद झाले. हजारो कुटुंबे देशोधडीला लागली. याचे उत्तरदायित्व कोणाचे ? नंतर देशाला टाळ्या व थाळ्या वाजविण्याचा उपक्रम दिला.लसीकरण धोरण सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर रुळावर आले. कोरोनाच्या हाताळणीत अपयशी ठरलेल्यात आपला समावेश का झाला ? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली असती तर बरे झाले असते.अर्थात ती दिली जाणार नाहीत हे आता जनताही जाणून आहे.आता हे बोलणे 'देर आये लेकिन दुरुस्त आये ' असले तरी त्यामुळे झालेली सर्वसामान्यांची होरपळ फार मोठी होती व आहे हे विवेकाने विचार केला की लक्षात येते.