प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी शहरात विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या पुढाकारातून पंचगंगा नदीवरील स्मशानभूमी परिसराचे विविध मुलभूत सुविधा पुरवत मोठ्या कल्पकतेतून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यात आता पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी करत मोठी कंबर कसली आहे. या प्रयत्नाला काही सामाजिक संस्था ,संघटना व जागृत नागरिकांच्या रुपाने लोकसहभागाचे मोठे पाठबळ मिळू लागले आहे.त्यामुळे शहराच्या वैभवात भर घालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न नागरिकांमध्ये मोठा कौतुकाचा विषय ठरु लागला आहे.
इचलकरंजी नगरपालिकेत लोकप्रतिनिधी व प्रशासनात योग्य समन्वय नसल्याने अनेक विकासकामांचे घोंगडे तसेच भिजत पडल्याची चर्चा शहरवासियांमधून सातत्याने ऐकायला मिळत असते.त्यात पंचगंगा नदी प्रदूषण आणि स्मशानभूमी परिसराची दुरावस्था हे प्रश्न देखील सातत्याने चर्चेत येत असतात. असे असले तरी याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात कमालीची उदासीनता दाखवण्यात आल्याचा आरोप सूज्ञ नागरिकांतून केला जात होता.पण ,उशीरा का असेना या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाबरोबरच स्वच्छता दूत गजानन महाजन गुरुजी ,इचलकरंजी नागरिक मंच ,पैलवान अम्रुत भोसले युवा शक्ती या सह काही सामाजिक संस्था व संघटनांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. याचेच फलित म्हणजे पालिका प्रशासनाने पंचगंगा नदी घाटावर जनावरांबरोबरच धुणे व वाहने स्वच्छ करण्यास आणि पुजेचे निर्माल्य ,इतर वस्तू नदीतील प्रवाहित पाण्यामध्ये टाकण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. यासाठी नदीघाटावर स्वच्छता राखण्या बरोबरच काठ्या लावून सूचनांचे फलकही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पंचगंगा माई स्वच्छ असावी ,सहज जरी डोकावलं तरी तळापर्यंत दिसावी अशा संदेशाचे लायन्स क्लबने दीघाटावर ठिकठिकाणी फलक लावून त्याची जनजागृती देखील करण्यात येत आहे. या कार्या मध्ये काही सामाजिक संस्था ,संघटना व जागृत नागरिकांनी सहभाग नोंदवत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीच्या चळवळीला लोकसहभागाचे पाठबळ मिळत असल्याचे दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी पंचगंगा नदी घाटावरील स्मशानभूमी परिसराची मुलभूत नागरी सुविधांअभावी अत्यंत दुरावस्था झाली होती.यासाठी देखील आता
चाणक्य अंत्यसंस्कार सेवा केंद्र ,दीपस्तंभ सामाजिक संघटना ,फाय फौंडेशन ,राजस्थानी जैन सेवा समिती ,राजस्थानी युवक समाज यासह काही सामाजिक संस्था ,संघटना व दानशूर व्यक्तींच्या विविध मदतीच्या माध्यमातून पुढाकार घेवून याठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था ,अंत्यविधीसाठी साहित्य पुरवणे ,इमारतीची रंगरंगोटी ,विविध झाडांचे रोपन करुन गर्द सावली निर्माण करणे ,आंघोळीसाठी गरम - थंड पाण्याची व बाथरुमची व्यवस्था ,अंत्यविधीची रक्षा पाण्यात न सोडता ती रक्षाकुंडात टाकण्याची व्यवस्था ,नियमित स्वच्छता ,हिरवळ लागवड ,शिवशंकर मूर्तीची प्रतिष्ठापना ,वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था आणि अंत्यविधी सोपस्कारासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती व योग्य देखभाल अशा मुलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्मशानभूमी परिसराचे सुशोभिकरण होवून त्याचेअक्षरशः रुपच पालटले आहे.त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण आणि स्मशानभूमी परिसराच्या दुरावस्थेमुळे नागरिकांच्या गैरसोयीच्या प्रकाराला रोखण्यास मोठे यश मिळू लागले आहे.एकंदरीत ,शहराच्या वैभवात भर घालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न नागरिकांमध्ये मोठा कौतुकाचा विषय ठरु लागला आहे.