आगीत सुमारे वीस लाखाचे नुकसान , सुदैवाने जीवितहानी टळली.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या ऑइल निर्मितीच्या कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागून मोठा भडका उडाला. कल्लाप्पाण्णा आवाडे इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या औद्योगिक वसाहतीमधील विजेता प्रॉडक्ट या ऑइल कंपनीचे आगीत सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले आहे.आज पहाटेच्या सुमारास लागलेली आग तीन तासांनी आटोक्यात आणली. तब्बल 25 हुन अधिक अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यास मदत झाली. सुदैवाने जीवितहानी टळली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क नावाची औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत गेल्या सहा महिन्यांपासून विजेता प्रोडक्ट हा वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या ऑइल निर्मितीचा कारखाना सुरु होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक या कारखान्यात आग लागली. ऑइलसारख्या जळाऊ पदार्थ कारखान्यात असल्याने आगीचा मोठा भडका उडाला. आगीचे लोट दूरवरून दिसत होते. घटनास्थळी प्रसंगावधान राखत जीवितहानी टळली. आसपासच्या नगरपालिका हद्दीतील तसेच सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल 25 अग्निशामक बंबाच्या सहाय्याने अडीच तासानंतर आग विझवण्यात यश आले. आगीत सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले आहे.