प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
यंत्रमाग उद्योगाच्या २७ अश्वशक्तीवरील वीज बिलातील सवलत योजना पूर्ववत सुरु करुन त्याचा लाभ सर्व यंत्रमागधारकांना मिळावा ,यासाठी सर्वांना सोबत घेऊन मनसे रस्त्यावर उतरून लढा देण्यास सज्ज आहे. त्यामुळे सर्वच राजकारण्यांनी स्वतःचे जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे आणि रोजीरोटी देणारा उद्योग वाचवावा, असे आवाहन मनसेचे नेते पुंडलिक जाधव यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केले.
शेती खालो खाल सर्वाधिक रोजगार देणारा रोजगार म्हणून यंत्रमाग उद्योगाकडे पाहिले जाते.पण ,दुर्देव असे की या उद्योगाकडे सरकार कधीच गंभीरपणे पहात नाही. त्यामुळे या उद्योगाला विविध संकटांशी सामना करावा लागत आहे. शासनाची नाकर्तेपणाची भूमिका उद्योगाला अत्यंत धोकादायक ठरु लागली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एकमुखी ताकद लावून यंत्रमाग उद्योग वाचवणे आता गरजेचे बनले आहे.यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी त्यासाठी पुढाकार घ्यायला मनसे तयार असल्याची भूमिका मनसेचे नेते पुंडलिक जाधव यांनी पत्रकार बैठकीत मांडून सर्वांच्या जिव्हाळ्याचा व रोजीरोटीचा हा प्रश्न इचलकरंजीसह संपूर्ण राज्यात घेऊन जाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने यंत्रमाग उद्योगाच्या २७ अश्वशक्तीवरील वीज बील सवलत योजना सरसकट सर्व यंत्रमागधारकांना लागू करावी, यासाठी कोणत्याही अटी व शर्ती लावू नयेत, अशी मनसेची मागणी आहे. सूत दराचा सट्टा बाजार थांबवण्याची मागणी करत याबाबत वेळीच कार्यवाही न झाल्यास सरकारला जागे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ,असा इशारा देखील मनसेचे नेते पुंडलिक जाधव यांनी दिला.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष प्रताप पाटील, रवी गोंदकर, मोहन मालवणकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, महेश शेंडे ,अनिल झाडबुके , योगेश तिवारी ,राहुल दवडते ,योगेश दाभोळकर यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.