प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच या निमित्त प्रसिद्ध व्याख्यात्या कुरुंदवाडच्या माजी नगराध्यक्षा ,हेरवाड हायस्कूलच्या शिक्षिका सौ.मनीषा डांगे यांनी विद्यार्थीनींना मौलिक मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. बा. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवासी बोहरा होते.
यावेळी प्रमुख व्याख्यात्या सौ. मनिषा डांगे म्हणाल्या, सावित्रीमाई या भारतातल्या पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका व समाजसेविका होत्या. सावित्रीमाईंनी जाती व्यवस्था व वर्णव्यवस्था आडवी करण्यासाठी आडवे कुंकू लावले होते. महात्मा फुले यांनी 1 जानेवारी रोजी मुलींची पहिली शाळा काढली. हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून मानला पाहिजे. सावित्रीबाईंनी अनेक संकटावर मात करून आपले शैक्षणिक कार्य सुरू ठेवले. आजही महिलांबरोबरच मुलींना छेडणारे,त्रास देणारे लांडगे समाजात आहेत. त्यांचे तोंड रंगवण्याचे धाडस मुलींनी दाखवले पाहिजे. महात्मा फुलेंनी त्यावेळच्या काळात बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू करून वेगळा आदर्श घालून दिला होता. परंतु आज गर्भात मुली मारल्या जात आहेत , ही मोठी शोकांतिका आहे. आपला खरा शत्रू अज्ञान आहे. शिक्षणामुळे अज्ञान दूर होईल व महिला सक्षम होतील असे मौलिक विचार मांडले. स्वागत व प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीमाईंनी शिक्षण घेऊन समाज सुधारण्याचे कार्य केले. शिक्षण, स्वावलंबन, आत्मनिर्भरता या क्षेत्रात कार्य करून महिलांना सक्षम बनवण्यासाठी कार्य केले. महिलांनी अडचणींवर मात करून आपल्या विचाराने काम करायचे धाडस दाखवले पाहिजे. खरंतर आदर्श नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करणे ही सावित्रीबाईंना खरी आदरांजली ठरेल ,असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा म्हणाले, सावित्रीमाईंच्या कार्याची प्रेरणा घेऊन साधेपणा व जिद्द हे गुण आत्मसात करून मुलींनी आपली प्रगती करावी.जेणेकरुन तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वाचे अस्तित्व निर्माण करता येईल.
यावेळी स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमनकर , संस्थेचे विश्वस्त महेश बांदवलकर, उपप्राचार्य आर. एस एस. पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी आदिती शिंदे, अलहिदा शेख, पालक, शिक्षक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवाल वाचन विभाग प्रमुख प्रा. सौ. एस. एस. माने यांनी केले. स्वागत गीत सौ. रानडे व विद्यार्थिनींनी गायले, सूत्रसंचालन सौ. जी. एस. भमनगे यांनी केले. आभार पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे यांनी मानले. यावेळी विविध स्पर्धेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.