३१ डिसेंबरचा खर्च टाळत इनामची अन्नदान उपक्रमास ३३ हजारांची मदत



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी नागरिक मंच,बिजनेस पॉईंट ग्रुप व जेंटलमन ग्रुप यांच्या मार्फत शहरातील गरजू व  निराधार नागरिकांसाठी गेल्या सात महिन्यांपासून दोनवेळचे मोफत अन्नदान उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी ३१ डिसेंबर वर्ष अखेरचा अनाठायी खर्च टाळून व सोशल मिडीयाचा अनोखा वापर करत सुमारे ३३ हजारांची मदत करण्यात आली.या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

इचलकरंजी शहर हे कष्टकऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातील कोणीही नागरिक उपाशी राहू नये ,याच उदात्त भावनेतून इचलकरंजी नागरिक मंच,बिजनेस पॉईंट ग्रुप व जेंटलमन ग्रुप यांच्या मार्फत शहरातील गरजू व  निराधार नागरिकांसाठी गेल्या सात महिन्यांपासून दोनवेळचे मोफत अन्नदान उपक्रम राबवण्यात येत आहे. 

सदर उपक्रमाद्वारे ज्या नागरिकांना मोफत मिळालेले जेवणही जाऊन घेता येत नाही , त्यांच्यासाठी घरपोहच जेवण पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच ३० कुटुंबांना दर महिन्याला मासिक पुरेल इतके किराणा सामान देण्यात येते. 

इचलकरंजी नागरिक मंच ही नागरिकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून इचलकरंजी शहरात परिचित आहे.३१ डिसेंबरच्या नियोजनातील काही रक्कम अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमास देण्याचे आवाहन सदर संघटनेने सोशल मिडीयावरील फेसबुक व व्हाट्सएप ग्रुपवर केले होते.सदर आवाहनास इनाम सदस्यांनी जोरदार प्रतिसाद देत शंभर रुपयांपासून ते एकतीसशे रुपये अशी सुमारे ३३ हजार रुपयांची रक्कम मदत म्हणून जमा केली.

या मध्ये इनाम व्हाटसप ग्रुपवर कार्यरत असणाऱ्या सर्वसामान्य नोकरदारां पासून ते डॉक्टर,  वकील, पत्रकार, व्यापारी,उद्योजक,इंजिनियर अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे.या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post