प्रेस मीडिया ऑनलाइन :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)
स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन 'राष्ट्रीय युवा दिन 'म्हणून साजरा केला जातो.१२जानेवारी २०२२ रोजी स्वामीजींचा १५९ वा जन्मदिन साजरा झाला. स्वामी विवेकानंद म्हटले की एक वैचारिक श्रीमंतीचा संन्यस्त समाजवादी आपल्यासमोर उभे राहतात.शिकागोच्या धर्मपरिषदेतं 'धर्म म्हणजे काय 'हे जगाला सांगणारे आहे एक विश्वमान्य थोर विचारवंत दिसून येतात. स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल आदर असलेल्या प्रत्येक युवकाने स्वामीजींचे प्रत्यक्ष विचार समजून घेतले पाहिजेत. 'नवा भारत घडवण्याची त्यांची संकल्पना काय होती ही त्यांच्याच शब्दात समजून घेतली पाहिजे.धर्म आणि राजकारण याबाबत त्यांची मते काय होती हे समजून घेतले पाहिजे. आज देशातील तरुण वर्गाला जर खरी गरज कुठली असेल तर विवेकानंदांच्या विचारांची गरज आहे यात शंका नाही.कारण आज धर्माच्या नावावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी मोठी प्रतारणा केली जात आहे. याबाबतचे एक ताजे उदाहरण समजून घेऊ.मग स्वामी विवेकानंद काय म्हणाले होते ते पाहू. म्हणजे आपल्याला धर्म आणि अधर्म, धर्मशील आणि परधर्मद्वेषी , धर्मदृष्टीआणि धर्मांधता यातील नेमका फरक कळेल.आणि नवा भारत घडवायचा म्हणजे नेमकं काय करायचं हेही कळून येईल.
हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबर २०२१ दरम्यान स्वयंघोषित धर्मरक्षकांची धर्मसंसद(?) झाली.या धर्मसंसदेचे मध्यवर्ती सूत्रच ‘इस्लामिक भारतात सनातनचे (हिंदू धर्म) भविष्य’ असे धादांत खोटे व द्वेषमूलक होते. यात हजारांहून अधिक स्वयंघोधित संत-महंत , साधू-साध्वी सहभागी होते.खरतर कुठल्याही धर्माची परिषद असू शकते संसद नव्हे.कारण संसद ही संवैधानिक कायद्याने बद्ध असते.तिची घटनात्मक मूल्यांशी बांधिलकी असते. या तथाकथित धर्मसंसदेत माणूस म्हणून माणसाची अवहेलना करण्याचा अत्यन्त विकृत प्रयत्न झाला.
धर्मसंसदे सारखे खऱ्या संसदेशी द्रोह करणारे शब्द लोकभ्रम तयार करण्यासाठी वापरले जातात. ते नवीनही नाही. मुद्दा आहे तो धर्माच्या नावावर झालेल्या या संसदेत अत्यंत खुनशी, विकृत, हिंसेला चिथावणी देणारी व समर्थन करणारी भाषणे झाली त्याचा.ती करणारे खुनशी विकृतीचे लोक मोकाट आहेत त्याचा. अशा विकृतांवर कोणतीही कारवाई न करणाऱ्या सरकारचा. आपल्या हिंसक उक्ती व कृतीला सरकारचे संरक्षण आहे या मस्तीत वाढणाऱ्या बेतालांचा. या कार्यक्रमातील बेताल वक्तव्यांची मा. पंतप्रधानांनी व केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी देशातील अनेक विचारवंतांनी एकत्र येऊन केली आहे त्यावर काहीही भाष्य न करणाऱ्या विकृतीचा. हे मुद्दे गांभीर्याने घेणे यातच खऱ्या भारतीय संसदेचे हीत आहे.
या धर्मपरिषदेच्या कार्यक्रमाचे आयोजन अनेक गुन्हे दाखल असलेल्या यती नरसिंगानंद यांनी केले होते. त्यांच्या मते मुस्लिम जिहाद अटळ असून त्याविरोधात हिंदूंनी शस्त्र घेऊन एकवटले पाहिजे.हिंदू रक्षा समिती या नावाच्या संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष प्रबोधानंद गिरि यांनी, मुस्लिमांचे शिरकाण करण्याचे जाहीर आवाहन केले. ते म्हणाले म्यानमार च्या धर्तीवर आपले राजकीय नेते, लष्कर ,पोलीस, आम जनता यांनी हातात शस्त्र घेऊन हे 'स्वच्छता अभियान 'राबवले पाहिजे. साध्वी अन्नपूर्णा असे नाव धारण करणाऱ्या पूजा शकुन पांडे यांनी आता वंशहत्या केलीच पाहिजे असे
म्हणत सांगितले की, आपल्याला खरे हिंदु राष्ट्र आणायचे असेल तर किमान शंभर लोक असे तयार झाले पाहिजेत जे वीस लाख मुस्लिमांना ठार करू शकतील.'
एकाने तमिळ टायगर प्रमाणे हिंदू धर्मासाठी लढणाऱ्या युवा संन्यासीना एक कोटी रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले.
सांभवी धाम आखाड्याचे प्रमुख स्वामी आनंदस्वरूप म्हणाले की, ‘हरिद्वारमध्ये ख्रिसमस साजरा होता कामा नये तसेच मुस्लिम विक्रेत्यांवर बहिष्कार टाका. या धर्मसंसदेत बोलला गेलेला प्रत्येक शब्द ईश्वरी वाणी आहे, त्यामुळे सरकारने ती ऐकलीच पाहिजे. कोण म्हणाले ‘हिंदूंनी भरपूर मुले जन्माला घालावीत आणि चांगली शस्त्रे जवळ बाळगावीत. मुस्लिम व्यक्ती पंतप्रधान होऊ द्यायची नसेल तर हे केलेच पाहिजे. एकजण म्हणले ,मी खासदार असतो तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना संसदेतच गोळ्या घातल्या असत्या.गांधीजींच्या बद्दलही येथे गरळ ओकली गेली आणि नथुरामचा उदोउदो केला गेला. एकूण ही वक्तव्ये पाहिली की ही धर्मसंसद अजिबात नव्हती तर मुठभर भंपकांचा गरळअड्डा होता हे स्पष्ट दिसते. या पार्श्वभूमीवर युवा वर्गाने विवेकानंद समजून घेणे गरजेचे आहे.
शिकागो धर्म परिषदेमुळे विवेकानंदांची महती जगाला कळली. विवेकानंदांनी तेथे केलेले भाषण धर्मविचारांना नवी दिशा देणारे होते. ११ सप्टेंबर १८९३ रोजीच्या त्याठिकाणी केलेल्या भाषणात विवेकानंदानी संन्यासी व हिंदू धर्माची भूमिका मांडली.ते म्हणाले होते, या सुंदर जगाचे अत्यंत नुकसान जर कशाने झाले असेल तर ते आंधळ्या धर्मवेडा मुळे झाले आहे. प्रत्येक धर्मातील धर्मवेडे ,धर्मांधता बाजूला काढली व सर्व धर्मांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास ते एकच असल्याचे जाणवते.आणि सर्वांचे अंतिम ध्येय एकच असल्याची खात्री पटते. परंतु ते उदात्त तत्व समजून घेतले जात नाही. म्हणूनच संपूर्ण जगभर त्याचा प्रसार करण्यासाठी आपण सर्वधर्मीय अभ्यासू मंडळी या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. ही धर्म परिषद सर्व धर्माचा नेमका गाभा समजून घेऊन धर्मांधतेच्या मुळावर घाव घालणारा वज्राघात ठरेल.'
विवेकानंदांची धर्माकडे बघण्याची दृष्टी व्यापक होती. जिथे आणि ज्या अवस्थेत माणूस असेल तिथे आणि त्या अवस्थेत धर्म त्याला सहाय्य करणारा ठरला पाहिजे. तसे जर धर्म करू शकत नसेल तर तो बिनकामाचा आहे.मग मूठभर लोकांच्या चिंतनाचा विषय एवढीच त्याची किंमत ठरेल अशी त्यांची भूमिका होती. कोणत्याही धर्मापेक्षा मानव धर्म श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात ,जोपर्यंत तुम्ही मानव जगतात मानव देहात अवस्थित आहात ,तोपर्यंत तुम्हाला मानवी भावनांतूनच या जगाची उपलब्धता होऊ शकेल. तुमचा धर्मही मानवी असेल आणि तुमचा ईश्वरही मानवीच असेल.
भाकरी हीच माणसाची खरी गरज आहे. या जगात पोटाची आग विझवण्यासाठी भाकरी मिळ्वून देण्या ऐवजी माणसाला त्याच्या मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देण्याचे आमिष दाखवणारा ईश्वर विवेकानंदांना अभिप्रेत नव्हता.आपल्या स्वार्थासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांना आणि त्याला बळी पडणाऱ्याना उद्देशून विवेकानंद म्हणाले होते,धर्माचरण करणारी ऐंशी टक्के माणसे ढोंगी आणि फसवेगिरी करणारी असतात. पंधरा टक्के माणसे वेडी असतात आणि फक्त पाच टक्के आचरणकर्त्या माणसांना अंतिम सत्याच्या साक्षात्काराचा केवळ एखादा किरण दिसण्याची शक्यता असते.म्हणून हे धर्मपरायण लोकांना, तुम्हाला आवर्जून सांगतो की ,धर्म या संकल्पनेपासून जपून राहा आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करा.'
सर्व धर्माच्या अभ्यासातून त्यातील सारतत्त्वांची गुंफण विवेकानंदांनी केली.त्यातून ' नववेदांत 'मांडला. आपल्या अंतःकरणातील अहंकाराचा निचरा करून सर्वच धर्म श्रेष्ठ आहेत अशी भावना बळावल्यानेच परमेश्वर अंतकरणात प्रगट होतो ही रामकृष्ण परमहंस यांची शिकवण विवेकानंदांच्या नववेदांताचा मूळ स्त्रोत बनली.विवेकानंद म्हणतात,' माझ्या वेदांत धर्माला व्यक्ती प्रामाण्याची आवश्यकता नाही. तर माणसाचा शाश्वत स्वभाव हेच त्याचे प्रामाण्य आहे.त्यामुळे ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याला माझा वेदांत नास्तिक म्हणतो. सत्य हाच नववेदांताचा परमेश्वर आहे हे स्पष्ट करणाऱ्या विवेकानंदांनी कोणत्याही विशिष्ट धर्माचे आणि धर्म मताचे आपण प्रसारक नाही हे ठासून सांगितले आहे.
विवेकानंदांचा ग्रंथप्रामाण्याला विरोध होता. ग्रंथ हे धर्माचे आधार नसतात तर धर्म हा ग्रंथाचा आधार असतो. धर्मग्रंथातील वचने हे धर्माचे बाह्यांग असते ,नीती हे खऱ्या धर्माचे सार आहे असे ते सांगतात. नीतीच्या कसोटीला न उतरणार्या धर्मपिठांच्या आज्ञा मानू नयेत हे त्यांनी सांगितले.(
अस्पृश्यता, विषमता,अनितिचे समर्थन करणारी शास्त्रवचने धर्मविरोधी आहेत असे ते मानत.विज्ञान, तत्त्वज्ञान ,धर्म यांना कोणत्याही एकाच शास्त्रग्रंथाचे आदेश पाळण्यात भाग पाडणे हे त्यांना अन्यायकारक वाटे. धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्वाची अनुभूती विवेकानंदांना सततच्या वाचन, मनन, चिंतन, अनुभवातून प्राप्त झाली होती.तिच्या प्रसारासाठी हा सन्यासी प्रबोधक आजन्म झटत राहिला.
भारतीय समाज आणि सामाजिक वर्तनाचा विवेकंदानी सूक्ष्म अभ्यास केला होता.वस्तुस्थितीचे नेमके आकलन करून घेणारी असामान्य बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती. म्हणून तर त्यांनी नेहमीच दीनदलितांची बाजू उचलून धरली. जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांनी भारतातील सामाजिक अन्यायाची मुळे रोवली.माणसामाणसांत त्यामुळे अंतर पडले. त्यामुळे तिचा समूळ नाश झाल्याशिवाय सामाजिक प्रगती होणार नाही हे त्यांनी जाणले होते. भारतीय अस्पृश्याप्रमाणेच अमेरिकन निग्रोंचे जीवनही त्यांनी जवळून पाहिले होते. म्हणून तर जन्मावरून आणि अनुवांशीकते वरून माणसाचे गुण ठरवणाऱ्याना ते मूर्ख, राक्षसी आणि निर्घृण म्हणाले होते. अस्पृश्यतेतून आलेला ' शिऊ नका वाद ' हा खरा धर्म नाहीच तर तो काही मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मात घुसवलेला मानसिक रोग आहे असे ते मानत.लोक ज्ञानी झाले तर आपण कमावलेली प्रतिष्ठा आणि आपल्याला फुकट लाभलेले विशेषाधिकार गमवायची वेळ आपल्यावर येईल या भीतीतुनच 'शिऊ नका वादाची निर्मिती झाली असे त्यांनी म्हटले होते.विवेकानंदांचा हा धर्मविचार आपण समजुन घेतला पाहीजे शिकागोची व्यापक धर्मपरिषद आणि हरिद्वारची धर्मद्वेषी विषचिमूट यातील नेमका फरक ध्यानात घेतला पाहिजे.
( लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)