माणकापूरच्या सरपंचपदी काँग्रेसच्या सौ.वैशाली कुंभार यांची निवड



प्रेस मीडिया :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरालगतच्या माणकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौ. वैशाली कुंभार यांचा विजय झाला.त्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्धी  भाजपच्या उमेदवार जयश्री  पुजारी यांच्यावर पाच मतांचे मताधिक्य घेऊन विजय मिळवला.या विजयाच्या रुपाने माणकापूर ग्रामपंचायतमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे राजकीय पारडे जड झाले आहे.


राजकीयद्रुष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून उत्तर कर्नाटकात माणकापूर ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. त्यामुळे याठिकाणच्या राजकीय घडामोडींकडे अगदी कर्नाटक राज्याच्या सत्तेतील मंत्र्यांबरोबरच  सर्वच पक्षांच्या नेत्यांचे अगदी कटाक्षाने लक्ष लागून राहिलेले असते.नुकताच या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक लागल्याने या पदावर भाजप की काँग्रेस यापैकी कोणत्या पक्षाचा उमेदवार

विराजमान होणार ,याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. या पदासाठी भाजपकडून जयश्री पुजारी आणि काँग्रेसकडून वैशाली कुंभार या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या.त्यामुळे साहजिकच ही निवडणूक भाजप व काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती.याचाच एक भाग म्हणून पडद्यामागच्या राजकीय घडामोडींनी देखील मोठा वेग घेतला होता.अखेर सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने

सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केले होते.यासाठी निवडणूक अधिका-यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली.यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार सौ. वैशाली कुंभार यांचा विजय झाला.त्यांनी

आपल्या राजकीय प्रतिस्पर्धी  भाजपच्या उमेदवार जयश्री  पुजारी यांच्यावर पाच मतांचे मताधिक्य घेऊन विजय मिळवला.या विजयाप्रित्यर्थ नूतन सरपंच सौ.वैशाली कुंभार यांचा युवा नेते उत्तम पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

सरपंचपदाच्या या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौ. वैशाली कुंभार यांच्या विजयासाठी निपाणीचे माजी आमदार काका पाटील आणि युवा नेते उत्तम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी सरपंच अभय चौगुले ,विठ्ठल कटेकर, उत्तम बन्ने , राकेश चौगुले, धनंजय माळी, राजू कुंभार, रुपाली चौगुले, अलका चौगुले यांचे सहकार्य लाभले.

यावेळी काँग्रेस समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post