प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी / प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्य आस्थापनांना दिलेल्या सवलतीप्रमाणे कोरोना नियमांची अंमलबजावणी करत शाळा ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशन म्हणजे इम्सा संघटनेचे शहर अध्यक्ष नंदराज पवार यांनी शासनाकडे पत्रकार बैठकीत बोलताना केली. तसेच १५ जानेवारीपर्यंत या संदर्भात निर्णय न झाल्यास १७ जानेवारीपासून शासन नियमास अधिन राहत ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु केल्या जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
राज्यातील कोरोना महामारी संकटामुळे मागील दोन्ही लॉकडाऊनमध्ये शासनाकडून शाळा बंद करण्याबाबत आततायीपणे निर्णय घेतला गेला. हा निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक नुकसानीचा विचार केला गेला नाही. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मुलभूत हक्क आहे व शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कावरच गदा येत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन शासनाने शाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीत परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन इम्सा संघटनेच्या वतीने पालिकेचे
मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले आहे. याबाबतीत विद्यार्थी व शाळांना योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इम्सा संघटनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष नंदराज पवार यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.
यावेळी इम्सा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश नायकुडे, जिल्हा उपाध्यक्ष एन. एन. काझी, सहसचिव विल्सन वास्कर ,जिल्हा कार्यकारणी सदस्य किरण माळी , क्रीडा अध्यक्ष सचिन नाईक, सुनिता केटकाळे, प्रविण मोहिते, प्राची कुलकर्णी, दत्तात्रय मिटके आदी उपस्थित होते.