प्रेस मीडिया ऑनलाइन :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
अनिल अवचट यांचं जाणं म्हणजे एका बहुआयामी कलावंताच ,दुर्मिळ व्यक्तिमत्त्वाच जाणं आहे. अवचट कोण होते ? म्हणण्यापेक्षा अवचट कोण नव्हते ?याचा विचार करावा लागतो. कारण ते अतिशय वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होत. कार्यकर्त्या पत्रकाराचा जन्मजात पिंड असणारे अनिल अवचट मोठे समाजभान असणारे लेखक होते. 'बाबा ' या नावाने सर्वदूर ,सर्वव्यापी, अबालवृद्धांशी संपर्क असणारा हा खरंच बाप माणूस होता.डॉक्टर,पत्रकार,संपादक, लेखक,चळवळ्या, समुपदेशक, मार्गदर्शक, चित्रकार,शिल्पकार,ओरिगामीकार बासरीवादक अशा विविध रुपात ते दिसत असत. त्यांच्या लेखणीचा आणि वाणीचा पिंड अतिशय वेगळा होता. त्यामुळे समाजजीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये अनिल अवचट उर्फ बाबा सुपरिचित होते. सर्वाना ते आपले वाटत होते. अतिशय व्यापक व संपन्न व्यक्तिमत्व असलेले आल्या बाबांचा कधीही बडेजाव दिसला नाही.
साहित्यापासून व्यसनमुक्तीपर्यंत आणि चित्रकारीपासून बासरीवादनापर्यंत त्यांनी केलेले काम आणि उमटवलेला ठसा अनमोल स्वरूपाचा आहे.अशा या बहुआयामी बाबांचा कित्येक वर्षाचा माझा स्नेह होता. समाजवादी प्रबोधिनीच्या कार्याविषयी त्यांना मोठी आस्था होती.गेली कित्येक वर्षे समाजवादी प्रबोधिनीत अल्कोहोलिक ॲनॉनिमसचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू आहे.दीपक सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने वीस वर्षांहून अधिक काळ व्यसनमुक्ती केंद्राच्या साप्ताहिक बैठका नियमितपणे समाजवादी प्रबोधिनीत होत असतात. या कामाला समाजवादी प्रबोधिनीचे सातत्यपूर्ण सहकार्य असते.या केंद्राच्या,बैठकांच्या निमित्ताने बाबा अनेकदा येथे येत असत. त्यांच्याशी होणारा संवाद हा नेहमीच प्रत्येकाला अतिशय सकारात्मक उर्जा देणारा असायचा. अनिल अवचट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य -संस्कृती - कला - विज्ञान - पत्रकारिता अशा बहुमुखी पर्यावरणाचा एक बुरुज ढासळला आहे. डॉ.अनिल अवचट यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराची विनम्र आदरांजली.