एसटी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देवून जपली माणुसकी




इचलकरंजी / प्रतिनिधी

एसटी परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे इचलकरंजी शहरात माणुसकी फौंडेशनने सुमारे शंभर एसटी वाहक चालकांना संसारोपयोगी साहित्य वाटप करुन खरीखुरी माणुसकी जपली आहे. या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंद आंदोलनाचा लढा सुरू आहे. यावर राज्य सरकारने समन्वयातून योग्य तोडगा काढण्या ऐवजी संबंधित कर्मचाऱ्यांचीबडतर्फी तसेच निलंबनाची कारवाई केली आहे. तरीदेखील हजारो कर्मचारी अद्याप बेमुदत काम बंद आंदोलनाच्या संपावर ठाम आहेत. सदरचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे कर्मचारी लक्ष ठेवून आहे.एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या न्याय - हक्कासाठी सुरु असलेल्या कामबंद आंदोलनाला सुमारे दोन महिने पूर्ण होत आहेत.परिणामी , दोन महिन्यांपासून पगार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.आधीच तुटपुंज्या पगारामुळे परिस्थिती बिकट असताना त्यात दोन महिने पगार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची मोठी उपासमार होत आहे. याची जाणीव ठेवून माणुसकी फौंडेशनचे सदस्य आनंद सालेचा यांचे वडील गौतम सालेचा यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त माणुसकी फौंडेशन व आनंद सालेचा, गोमटेश अँग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आणि दानशूर व्यक्तींच्या आर्थिक मदतीतून सुमारे शंभर एसटी वाहक चालकांना धान्य व संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.माणुसकी फौंडेशन व अन्य दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे तसेच बेमुदत कामबंद आंदोलनास मिळालेल्या पाठिंबामुळे काही एसटी कर्मचाऱ्यांना गहिवरुन येऊन अनेकांना अश्रू अनावर झाले. 

यावेळी माणुसकी फौंडेशन संस्थापक अध्यक्ष रवि जावळे ,  सदस्य तसेच दानशूर व्यक्ती व इचलकरंजी एसटी आगारमधील कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान ,माणुसकी फौंडेशनने एसटी कर्मचाऱ्यांना संसारोपयोगी साहित्य वाटप करत खरीखुरी माणुसकी जोपासली आहे. या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post