तिघांचा जागीच मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे ;
नवले पुल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनला आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे - कात्रज हून पुण्याकडे येणार्या नवीन सातारा - पुणे महामार्गावरील नवले पुल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनला आहे. आज सकाळी पुण्याहून सातार्याकडे जाणार्या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवले.त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबतची प्राथमिक माहिती अशी, पुण्याहून सातार्याच्या दिशेने एक ट्रक जात होता. नवले पुलापासून पुढे काही अंतरावर भूमकर पुलाजवळ त्याने पुढे असलेल्या एका दुचाकीस्वाराला धडक दिली त्यात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला काही जण थांबले होते. रस्त्याकडेला थांबलेल्यांवर ट्रक गेला. त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाला. या तरुणांच्या हातात बॅगा होत्या. ट्रकने त्यांना अक्षरश फरफटत नेले.
महामार्गावर अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सिंहगड वाहतूक विभाग तसेच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत कणसे व पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करत आहेत. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी बघ्यांनीसुद्धा मोठी गर्दी केली आहे.