पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे याला अटक.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अन्वरअली शेख :
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) निकालात फेरफार करून गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची माया गोळा केल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे आणि परिषदेच्या तांत्रिक विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही अटक केली.पोलिसांनी सुपे याच्या घरातून 88 लाख रुपये, सोन्याची नाणी, दाग दागिन्यांसह 5 लाख 50 हजार रुपयांच्या मुदतठेवी असा ऐवज जप्त केला.
दोघांनीही उमेदवारांकडून तब्बल 4 कोटी 20 लाख रुपये घेऊन वाटून घेत विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, एसपी विजयकुमार पळसुले उपस्थित होते.
राज्यातील म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. संभाजीनगर) यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी डॉ. देशमुख याच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी टीईटी परीक्षेत अपात्र झालेल्या 40 हून अधिक विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे सापडली होती. त्याच्या चौकशीमध्ये राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. गुरुवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पीआय मीनल पाटील, पीआय अंकुश चिंतामण, पीआय संगीता माळी, उपनिरीक्षक अनिल डफळ, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, उपनिरीक्षक रवींद्र गवारी, पडवळ, संदेश कर्णे, नितीन चांदणे, नवनाथ जाधव, सचिन वाजे, अनिल पुंडलिक, मानसी मोरे, शिवले, खेडेकर, कोळी यांनी केली.
काळ्या यादीतून कंपनीचे नाव काढले
टीईटी परीक्षा प्रक्रिया राबविताना जी. ए. कंपनीने ओएमआर शीट स्क@निंग केल्या नाहीत. त्याची माहिती परीक्षा परिषदेला दिली नव्हती. कंपनीकडून अनेक चुका करण्यात आल्याने राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. नोटीस बजावून दंडाची शिफारस केली होती. मात्र आयुक्त सुपे यांनी जी. ए. टेक्नॉलॉजीस सॉफ्टवेअर कंपनीचे नाव काळ्या यादीतून काढून टाकल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
टीईटी परीक्षेच्या निकालात फेरफार करून आरोपींनी गैरमार्गाचा अवलंब करीत कोटय़वधींची माया गोळा केली आहे. याप्रकरणी आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून तपास सुरू आहे. विशेषत: सायबर विभागाकडून विविध पेपर फुटीप्रकरणी खोलवर तपास करण्यात येत आहे.
अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त, पुणे शहर
पैसे कमविण्यासाठी तिघांनीही असा रचला डाव
राज्यात टीईटीची परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी झाली होती. त्यावेळी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेला जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. देशमुख याने आयुक्त सुपे आणि तांत्रिक सल्लागार सावरीकर यांनी संगनमत करून गैरमार्गाचा वापर केला. त्यानुसार एजंटच्या मदतीने काही परीक्षार्थींची माहिती मिळविली. त्यांना परीक्षेआधी जादा गुण देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार ते एक लाखापर्यंत रक्कम घेतली. आरोपींनी तब्बल 4 कोटी 20 लाख रुपये जमा करून ते आपापसात वाटून घेत विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केले. आरोपी सुपे याने 1 कोटी 70 लाख, डॉ. देशमुख याने 1 कोटी 25 लाख आणि सावरीकर याने 1 कोटी 25 लाख रुपये घेतल्याची कबुली दिली.
सीसीटीव्ही बंद करून गैरमार्ग अवलंबला
दलालांच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांकडून कोऱ्या उत्तरपत्रिका घेण्यात आल्या. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून संबंधितांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र केले. त्यासाठी त्यांनी पुरावा मागे राहू नये यासाठी खोलीतील सीसीटीव्ही बंद करून पेपर सोडवत गैरमार्गाचा अवलंब केला.