प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सोमवार ता.६ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पासष्ठावा महापरिनिर्वाणदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर प्रज्ञावंत ,तत्त्वचिंतक ,अर्थतज्ञ ,समाजशास्त्रज्ञ, चिकित्सक लेखक,ख्यातनाम संपादक ,बुजुर्ग नेते अशा विविध पैलूंनी युक्त असे ते महामानव होते. कोलंबिया विद्यापीठातून त्यानी अर्थशास्त्र विषयात एम.ए.पीएच.डी. केली होती.यावर्षी कॅनडा देशातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताने भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल २०२१ हा जन्म दिवस ' समानता दिन ' म्हणून घोषित केला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जगातील विविध देशांनी,संस्थांनी,प्रांतांनी विविध प्रकारे सन्मानित करून त्यांच्या विचारांचे सार्वकालिक महत्व अधोरेखित केले आहे.कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया शासनाचा हा निर्णय असाच स्वागतार्ह आहे.
ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या वतीने याबाबतचे एक पत्र प्रकाशित केले होते. त्यात म्हंटले आहे,ब्रिटीश कोलंबिया हा सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण प्रांत आहे.ज्यात बरेच लोक आणि समुदाय यांचा समावेश आहे.येथे आदिवासी, कृष्णवर्णीय आणि अन्य मागास समाजातील लोक वर्णद्वेष, अन्याय, भेदभाव यांचा दाह सतत अनुभवत आहेत. ब्रिटीश कोलंबिया सरकार अशा सर्व प्रकारच्या वर्णद्वेषाला घालविण्यासाठी वचनबद्ध आहे. भारतात १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेले डॉ. बी. आर. आंबेडकर हे भारतीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. “भारतीय राज्यघटनेचे जनक” म्हणून ओळखले जाणारे डॉ.आंबेडकर समाजसुधारक सुधारक होते.त्यांनी दलित समाजांच्या हक्कांसाठी वकिली केली. जातीवर आधारित भेदभावाविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले .त्यांच्या जन्मदिनी आपण जाहीर करत असलेला 'डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिवस 'म्हणजे त्यांचे समानता आणि सामाजिक न्यायाविषयीचे समर्पण लक्षात ठेवण्याची आणि त्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यातून ब्रिटिश कोलंबियासह जगभरातील लोकांना प्रेरणा मिळणार आहे.आता आपण या घोषणापत्राद्वारे जाहीर करत आहोत की १४ एप्रिल २०२१ हा दिवस “डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिवस ”
म्हणून ब्रिटिश कोलंबिया प्रांतात ओळखला जाईल ".
या निमित्ताने सुदृढ समाजासाठी पुन्हा एकदा डॉ.आंबेडकरांच्या समतावादी विचारांचे महत्व अधोरेखित झाले आहे.तसेच आज जात - धर्म - लिंग - भाषा - प्रांत आदींच्या आधारे विषमता पेरण्याचे प्रयत्न जोरात होत आहेत. सांस्कृतिक राष्ट्रवाद वेगाने फोफावतो आहे. रोजी रोटीच्या ऐवजी आंधळे जातधर्म प्रेम आणि परधर्मद्वेष जागा केला जात आहे. म्हणूनच आपण सर्वानीच डॉ.आंबेडकर यांचें समतावादाचे विचार पुन्हा पुन्हा ध्यानात घेऊन त्याची कृतिशील अंमलबजावणी व्यक्तिगत व सामाजिक जीवनात करण्याची गरजही निर्माण झाली आहे.
' समान समाजातच समान संधीचे तत्व उपयोगी पडते. असमानांना समान वागणूक देणे म्हणजे असमानता कायमची टिकवून ठेवणे होय 'हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे.त्यामुळे ' समानतेने वागविणे ' हे महत्त्वाचे की ' समता प्रस्थापित करणे ' हे महत्त्वाचे ?. समता प्रस्थापित करणे हे ध्येय आहे की समान संधी देणे हे ध्येय आहे हे ठरवावे लागेल. ज्या समाजात समानता नाही त्या समाजाला जर सारखी संधी दिली तरी मुळातली असमानता तशीच राहील किंवा कदाचित वाढूही शकेल.त्यामुळे मागासलेल्यांना विशेष संधी देणे हे समाजाचे कर्तव्य व मागासलेल्यांचा हक्कच आहे. हे लक्षात घ्यावे लागेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे, " समतावादाचे ध्येय सर्वांना समान वागविणे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय असताना सर्वांना समतेने वागवून चालणे शक्य नाही.जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही व्यक्तींना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल.पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समता प्रस्थापनेच्या ध्येयाला विरोध करणे होय. समानांमध्येच समता नांदू शकते. असमानांना समान मानणे म्हणजे विषमता जोपासणे होय."
भारतीय घटना समितीच्या सभेत २५ नोव्हेंबर १९४९ रोजी म्हणजे राज्यघटना मंजूर होण्याच्या आदल्या दिवशी डॉ. आंबेडकर म्हणाले होते , " भारतीय समाजात आज दोन गोष्टींची कमतरता दिसून येते. त्यापैकी एक समता होय. सामाजिक क्षितिजावर आज स्तरात्मक असमानता आहे. त्यात काही वरिष्ठ आणि उरलेले बरेचसे कनिष्ठ पातळीवर आहेत.आर्थिक क्षितिजावर मूठभर लोक गर्भश्रीमंत आहेत तर बहुसंख्य अतिशय दारिद्र्याने पिचलेले आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी या राज्यघटनेचा अंमल करतानाच आपण एका विरोधाभासाच्या युगात प्रवेश करणार आहोत. राजकीय क्षेत्रात सर्वत्र समता असेल तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रात असमानता असेल. अशा विरोधात्मक परिस्थितीत आपण किती काळ राहू शकणार आहोत ? किती काळ आपण सामाजिक व आर्थिक समता नाकारू शकणार आहोत ? जर आपण लवकरात लवकर विरोधाभासाचे वातावरण दूर करू शकलो नाही तर घटना समितीने परिश्रमपूर्वक तयार केलेली राजकीय लोकशाहीची इमारत, जे विषमतेचे बळी ठरतील त्यांच्याकडून उखडली गेल्याशिवाय राहणार नाही." ब्रिटिश कोलंबिया प्रांताला आज समानता दिवस का साजरा करावा वाटला याचे उत्तर बाबासाहेबानी तेंव्हाच दिले होते हे त्यांचे द्रष्टेपण आहे.
डॉ. आंबेडकरांच्या समानता विचारात लोकशाही मूल्याचा आग्रह आहे. लोकशाही म्हणजे जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मूलभूत बदल घडवून आणणारी पद्धती आहे,आणि या बदलांना जनतेने कोणत्याही प्रकारच्या विवादाचा अथवा रक्तपाताचा आसरा न घेता मान्यता द्यावी अशी व्यवस्था असावी त्यांची धारणा होती. ' एक माणूस-एक मत ' यापेक्षा 'एक माणूस - एक मूल्य " हा त्यांच्या लोकशाही विचारांचा गाभा होता. म्हणूनच आंबेडकरांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक दडपशाहीविरुद्धच्या लढ्यासाठी आपले जीवन खर्च केले. त्यांना लोकशाहीतून खरी समता, खरे स्वातंत्र्य ,खरी बंधुता, खरा न्याय यांची प्रस्थापना करायची होती हे स्पष्ट होते. अस्पृश्य समाजाची प्रगती हाच बाबासाहेबांचा श्वास आणि ध्यास बनला होता.त्यांनी करोडो पिचलेल्या मनात स्वाभिमानाची पेरणी केली.अनेक शतके उपेक्षित आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या समाजात वैचारिक क्रांती घडवून आणली. बाबासाहेबांच्या मते कोणत्याही सुसंस्कृत समाजात श्रमविभागणी असते हे खरे. परंतु ती श्रमविभागणी श्रमिकांच्या जन्मभेदावर हवाबंद कप्पे तयार करणारी समाज व्यवस्था नसते.जातिसंस्था ही श्रमविभागणी नसून ती श्रमिकांचीही विभागणी असल्याने ती कृत्रिम आहे.
समतेचे मूल्य जनमानसात रुजवण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र परिश्रम केले.प्रचंड लोकसंपर्क, लोकसंग्रह केला. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र ,धर्मशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी समता - समानता ही मूल्ये बुद्धविचाराशी जोडली.ते म्हणतात, समता प्रस्थापित करताना समाजाला सहभाव किंवा स्वातंत्र्याचा बळी देता येणार नाही. सहभाव वा स्वातंत्र्य याशिवाय समतेला कसलाही अर्थ नाही. ही बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच या तीन गोष्टी एकत्र राहू शकतील. डॉ. आंबेडकरांचे आयुष्य एक गतिमान संघर्ष होता.अस्पृश्यतेचा दाह आजही भोगावा लागणे म्हणजे समते पासून आपण काही योजने दूर आहोत हे स्पष्ट आहे .म्हणूनच सर्वांगीण समता -समानता नांदायची असेल तर बाबासाहेबांचा विचार महत्वाचा ठरतो.