दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली माहिती..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ/ प्रतिनिधी:
क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र शासनाने ११ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आली असल्याची माहिती श्री दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली. क्षारपड जमीन मुक्तीचा श्री दत्तचा पॅटर्न देशभर राबविण्यास केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
१९१० हेक्टर करिता हेक्टरी ६० हजार प्रमाणे अनुदान मंजूर झाले आहे. जागतिक मृदा दिनादिवशीच ही आनंदाची बातमी समजल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
कारखान्याच्या कार्यस्थळावर घालवाड, कुटवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, बुबनाळ आधी गावातील क्षारपड जमीन मुक्त धारक शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी चार वर्षांपूर्वी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन मुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला. बहुसंख्य शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिला. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन मुक्तीचा दत्त पॅटर्न देशभर राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील शेडशाळ, गणेशवाडी, औरवाड, बुबनाळ, घालवाड, अर्जुनवाड, कवठेसार व कुटवाड या गावातील मुख्य सच्छिद्रपाईप लाईनचे काम पूर्ण झाल्याने केंद्र शासनाने याकामी ११ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. ही अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. क्षारपड मुक्तीचे काम झाले आहे अशा सर्व गावातील शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी खास प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली.
प्रारंभी स्वागत मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी केले. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील, भैय्यासाहेब पाटील, महेंद्र बागी, शेखर पाटील, सुनील सूर्यवंशी, औरवाडचे सरपंच अशरफ पटेल, काशीम मुल्लाणी, भाऊ खोंद्रे, सतपाल खोंद्रे, कृष्णदेव इंगळे, शामराव पाटील, महावीर माणकापूरे, सुदर्शन तकडे, महेश तारदाळे, राजू चौगुले, किर्तीवर्धन मरजे, सुभाष शहापुरे, सुरेश मरजे, प्रदीप चौगुले, गजानन करे, विलास पाटील यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी मानले.